ऊसाच्या फडांचा थाट, तरी उजळेना बाजाराची अंधारवाट


 

- संजीव उन्हाळे

गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी बाजारपेठेच्या गर्तेत सापडला आहे. आई जेवू घालिना अन् बाप भीक मागू देईना अशी अवस्था सरकारी प्रतारणेने झाली आहे. बाजारपेठेची ही उतरती कळा लक्षात घेऊन दुष्काळी पट्ट्यामध्ये थोडेफार सिंचित क्षेत्र असले तरी ऊस लागवडीने विक्रम केला. त्यात साखर स्वस्त झाली आणि गोड ऊसही कडू झाला. दोन वर्षांपासून अस्थिर बाजारामुळे शेतकरी अंधारातून वाट काढीत आहे, कधी तरी बाजारपेठ प्रकाशमान होईल या आशेने.

           

यावर्षी ऊसाचा तब्बल २ लाख हेक्टरचा नवीन पट्टा बीड, उस्मानाबाद आणि लातूर या दुष्काळी जिल्ह्यामध्ये तयार झाला आहे. एकीकडे लहरी मान्सून आणि दुसरीकडे बेभरवशाचे मार्केट या मान्सून-मार्केटच्या कचाट्यात शेतक-यांची इकडे आड, तिकडे विहीरअशी अवस्था झाली आहे. तूर पडून आहे, ज्वारीला भाव नाही, कापूस परवडेनासा झाला, त्यात पुन्हा तो बोंडअळीने खाल्ला, सोयाबीनचे भावही उतरले. उतरत्या बाजारपेठेने असा काही विऴखा घातला आहे की त्यातल्या त्यात सिंचित क्षेत्रामध्ये नगदी पिकाची निवड केली आहे. त्यातही साखरेचे भाव खाली उतरल्याने तेलही गेले आणि तूपही गेलेअशी अवस्था झाली. बाजारपेठेमुळे दोन वर्षांपासून शेतीव्यवस्था एका विचित्र कोंडीत सापडली आहे.

कापूस, सोयाबीनसारख्या पिकाकडून शेतकरी ऊसाकडे का वळला? महत्त्वाची बाब म्हणजे २०१६-१७ चा मान्सून बNयापैकी होता आणि त्यामुळे हमखास उत्पन्नाची शक्यता होती. कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नव्हते. त्या तुलनेत ऊस तोडणीसाठी मजूर मिळण्याची हमी आहे. कापसासारख्या पिकाला बोंडअळी आणि इतर रोगांचा प्रादुर्भाव झाला. ऊसाला मात्र कीटकनाशक वापरण्याचा खर्च होत नाही. तथापि, इतर पिकांच्या तुलनेत खत आणि इतर गोष्टीवरचा ऊसाचा खर्च तसा जास्त आहे. पण किमान आपल्या भागातील साखर कारखाना तो घेऊन जाईल याची खात्री होती पण साखरेचे भाव उतरल्याने अजून पहिले पेमेंटही नाही.

शिजेपर्यंत माणूस वाट पाहतो पण निवेपर्यंत वाट पाहू शकत नाही ही म्हण आहे. त्याप्रमाणे पीक निघेपर्यंत शेतकरी तग धरू शकतो पण पीक हातात पडल्यानंतर केव्हा एकदा बाजारात जाते याची त्याला मोठी धास्ती असते. गेल्या दोन वर्षांमध्ये प्रत्येक पिकाच्या बाबतीत बाजारपेठ कोसळत आहे. बँकांमार्फत इतर पिकाच्या तुलनेत ऊसाला जास्तीचे पीककर्ज मिळते. त्यामुळे सिंचित असलेल्या भागामधील शेतकरी ऊसाकडे वळत आहे.

विशेषत: बीड, उस्मानाबादसारख्या दुष्काळी जिल्ह्यातील ऊसाचे क्षेत्र लक्षणीयपणे वाढले आहे. सामान्यत: या भागामध्ये तूर, सोयाबीन आणि नंतर हरभरा घेतला जायचा. पण या तिन्हीही पिकांना यावर्षी भाव मिळाला नाही. दरम्यानच्या काळात जलयुक्तमुळे पाणीपातळी वाढली आणि शेतकरी ऊसाकडे वळला. अति पाण्याच्या वापराचे दुष्परिणाम त्यास ठाऊक आहेत. पण सध्याचे कृषी अर्थशास्त्र हे केवळ मार्केटिंगभोवती फिरत आहे. जितकी सहज बाजारपेठ उपलब्ध होईल त्या प्रमाणात शेतीला स्थैर्य येईल. या तुूलनेत किमान दहा हजार हेक्टरवर रेशीम उद्योगासाठी तुतीची लागवड करण्यात आली. किमान जालन्याला रेशीमाची बाजारपेठ तयार झाली हा सुध्दा एक महत्त्वाचा दिलासा आहे. ऊस शेतीपेक्षाही रेशीम उद्योग अधिक फायद्याचा आहे हे या ठिकाणी नमूद करणे आवश्यक आहे.

ऊस हे राजाश्रयी पीक असले तरी कोल्हापूर जिल्हा वगळता महाराष्ट्रातील जवळपास सर्व दुष्काळी भागातूनच ऊस लागवडीला सुरुवात झाली आहे. सह्याद्रीच्या कुशीतील दुष्काळी अहमदनगरचा भाग, सोलापूर जिल्हा असो की पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका, साखर पट्ट्याची सुरुवात ही दुष्काळी भागातूनच झाली आहे. तथापि, मराठवाड्याचा बराचसा भाग हा हवामान बदलाच्या दोलायमानतेत आणि दुष्काळाच्या कचाट्यात वारंवार सापडत आहे. वस्तुत: मांजरा, तेरणा, पैनगंगा, गोदावरी, पूर्णा, दुधना, या नद्यांच्या खोNयात हमखास पाण्याची उपलब्धता आहे. यावर्षी ऊसाच्या क्षेत्रात झालेली वाढ ही पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत सुद्धा जास्त आहे. तथापि, अस्मानी संकटात हा भाग किती काळ टिकून राहतो याबद्दल शंका आहे. तरीही यावर्षी नांदेड विभागाने विक्रमी ऊसाचे गाळप केले आहे. उताराही चांगला आहे. अडचण आहे ती केवळ ऊसाच्या दराची. शेवटी अंधारातही चालावं लागतंच. घसरत्या भावामुळे अंधारवाटेतून शेतकNयाला कधी तरी प्रकाशवाट दिसेल या आशेने तो पीकरचनेची आल्टापाल्टी करीत आहे एवढेच.