हे गणेशा, तिस-या भारताला करुणा बुद्धी दे
- संजीव
उन्हाळे
हे गजानना,
तू सुखकर्ता, दु:खहर्ता, विघ्नहर्ता
आहेस, मराठवाड्यावर मोठे अस्मानी संकट उभे होते. सारा खरीप हंगाम करपत
चालला होता. अशावेळी तूच वरुणराजाला मदतीला पाठवलेस. तोही मनसोक्त सर्वत्र बरसला.
दोनच दिवसात माना टाकलेली रोपे तरारून उभी राहिली. लोकांना आबादानी झाल्याचा
दिलासा मिळाला. हे बुद्धीच्या देवा, आता केवळ महाराष्ट्रच नव्हे अख्ख्या
भारतभूमीवर साक्षात बुद्धिवंतांचे सरकार आहे. त्यांना या देशाची नव्याने मांडणी
करायची आहे, नवभारत घडवायचा आहे. पण त्यांनी नुसता
निवडणुकांचाच ध्यास घेतला आहे. शेवटी लोकशाही म्हणजे आकड्यांचा खेळ, यावर
त्यांचा ठाम विश्वास आहे. सर्वसामान्य शेतक-यांच्या,
कष्टक-यांच्या हितापेक्षा निवडणुकीची व्यूहरचना
करण्यातच या बुद्धिमंतांचा वेळ चालला आहे. शेतक-याच्या
आत्महत्या घडत आहेत. शेती व्यवस्था देशोधडीला लागत आहे. बेकारांचे थवे रस्तोरस्ती
हिंडत आहेत. अनेकांच्या नोक-या जात आहेत. नव्याने उदयास आलेल्या
सोशल मिडियालाही याच्याशी काही देणेघेणे नाही. अशा अस्थिर परिस्थितीत हे सरकार
संवेदना गोठल्यासारखे कसे काय राज्य करू शकते? त्यांना
चांगली संवेदना दे!
विघ्नेश्वरा,
मोबाईलचे प्रस्थ खूपच वाढले आहे. सोशल मिडिया नावाचा नवाच वर्ग पसरत
आहे. गरीब आणि श्रीमंतांची दरी प्रचंड वाढत आहे. हे दयाघना, आजकाल
सगळी नेतेमंडळी, विचारवंत, लेखक,
राजकारणी ट्विट करीत असतात. तुलाही ट्विटच करावे लागेल. सर्वच जण
व्हॉट्सअप आणि फेसबुकवर असतात. सेल्फी तर रोमारोमात भिनली आहे. मरावे परी
सेल्फीरूपी उरावे अशी चढाओढ सुरू आहे. खास सेल्फी फोन निघाले आहेत. मोबाईलचा इतका
वापर चालला आहे की, तुमभी जिओ हम भी जिओ, अशी साद
घातली जाऊ लागली आहे.
हे गजानना,
सोशल मिडियाच्या रणधुमाळीमध्ये महात्मा गांधींच्या रामराज्यातील
शेवटचा माणूस दिसेनासा झाला आहे. त्याचे कोणाला दु:ख नाही. परवापर्यंत
सांस्कृतिकदृष्ट्या इंडिया विरुद्ध भारत अशी चर्चा होत असे, ट्विट
ट्विट करणा-या
‘टिटव्यांच्या भारताची’ त्यात भर पडली आहे. कर्जमाफीपासून पीक
विम्यापर्यंत ऑनलाईन अनिवार्य करून आता सामान्य शेतक-यांनाही
यामध्ये ओढले गेले आहे. खेड्यापाड्यातील तरुण मंडळीही तासनतास व्हॉट्सअप आणि फेसबुकशी
खेळत असतात. गेल्या वर्षभरात दोन मोठी आंदोलने सोशल मिडियाच्या माध्यमातून
शिस्तबद्धपणे उभारली गेली. तथापि, चाणक्यनीतीने ती सपशेल शमविली. तिसरा
इंडिया दखल घेण्याइतपत वाढत गेला आहे. समाजमन घडविणे असो की नवीन मतप्रवाह रूढ
करणे असो, सोशल मिडिया हे प्रभावी माध्यम ठरते आहे. अफवा पसरविणे, कंड्या
पिकविणे इथपासून ते यथेच्छ बदनामी करणे ही सुद्धा या सोशल मिडियाची दुसरी
काळीकुट्ट बाजू आहे. सद्यस्थितीत तर या सोशल मिडियाच्या इंडियाचे मत ग्राह्य धरले
जाऊ लागले आहे. ते सर्वसामान्य भारतीयांचे मत नसते. तरी तशी संभ्रमावस्था मात्र
निर्माण केली जाते. अर्थात, सोशल मिडियाचा वापर निवडणूक
जिंकण्यासाठी वापरण्यात आल्याने तो ठळकपणे जाणवू लागला आहे. ब्ल्यु व्हेलमुळे किशोरवयीन
मुलांना भुरळ घालून त्यांच्याकडून वाट्टेल ती कामे करून घेण्यात येतात. सोशल
मिडियाला कसलाही धरबंध नाही, कोणती आचारसंहिता नाही आणि गुन्ह्यांचा
तपास करावा तर सायबर गुन्हे शोधण्याचे तंत्र बाल्यावस्थेत आहे. या सर्व
प्रकारांमुळे तिस-या भारताबद्दल जशा अपेक्षा आहेत, तितकीच
मोठी धास्ती आहे.
हे विनायका,
एका बाजूला शेतक-यांच्या आत्महत्या थांबत नाहीत आणि
कर्जमाफीची ऑनलाईन नौटंकी सुरू आहे. आता शेतक-याचे
उत्पन्न दुप्पट करण्याची म्हणजेच डबलिंग द फार्मर्स इनकमची (डिएफआय) भाषा सुरू
आहे. शेतीमधील गुंतवणूक नगण्य झाली आहे. २०१६ च्या केंगच्या अहवालामध्ये याबद्दल
स्पष्ट ताशेरे ओढण्यात आले आहेत. आणि तरीही शेतक-यांचे
उत्पन्न दुप्पट करण्याची भाषा करायची द्यायचे मात्र काहीच नाही, बुद्धीभेद
करून वेळ मारून न्यायची असा प्रकार आहे. शेतक-यांचा
संप बघता बघता संपवला. २०११-१२ मध्ये शेतीवरचा खर्च २३०० कोटी रुपये होता. तो
भाजपचं राज्यात (२०१४-१५) ८२४.७१ कोटी रुपयावर घसरला. २०१५-१६ मध्ये तर
महाराष्ट्रामध्ये केवळ ३८६.४९ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य करण्यात आले. दुष्काळ
आपत्ती निवारण निधी गोळा केली जाते. किती पैसा दुष्काळासाठी वापरला गेला, ते
गुलदस्त्यातच राहते. दोन दिवसांच्या पावसाने मराठवाड्यात सर्वकाही अलबेल होईल असे
नाही. त्यामुळे या सरकारला दयाबुद्धी दे.
हे ओंकारा,
सोशल मिडियाचा हा वर्ग संघटित नाही. लाईक्स देऊन तो नुसता पाठिंबा
दर्शवितो. आपल्याकडे बोलके सुधारक आणि कर्ते सुधारक असे दोन वर्ग आहेत. सोशल
मिडियातील हा वर्ग कट-पेस्ट म्हणजे इकडचे तिकडे चिटकवणारा प्रतिक्रियावादी वर्ग
आहे. दुर्दैवाने या मंडळींच्या लाईक्सवर राजकारण आणि समाजकारणाची दिशा ठरू लागली
आहे. सामाजिक प्रश्नाबद्दलचा सामिलकी भाव शून्य असताना नुसताच फुगा निर्माण केला
जातो. त्यामुळे हे गजानना, हा तिसरा भारत तटस्थ, त्रयस्त,
बिनधास्त न राहता त्याची क्रियाशील सामिलकी होणे आवश्यक आहे.
हे गणराया,
औरंगाबादचे खासदार आणि आमदार द्वयांनी तुझ्या संरक्षणासाठी केलेली
मागणी ऐकून तुला कृतकृत्य झाल्यासारखे वाटले असेल. जुगार खेळू द्या आणि त्या जुगारातून
आलेला पैसा तुझ्या उत्सवासाठी वापरा असा नवीन फंडा या मंडळींनी सुचविला.
नोटाबंदीमुळे लोक गणपतीची वर्गणी देत नाहीत. पूर्वी मेळे व्हायचे, नाटक
सादर केली जायची, आता हा उत्सव जुगाराचे अड्डे करण्याचा या
मंडळींचा बेत आहे. जुगाराची ही गणेशभक्ती ऐकून तिस-या
भारतातील बौद्धिक दिवाळखोरी तुझ्या लक्षात आली असेलच. ही घटना सोडली तरी, राजकारणाच्या
जुगारात सोशल मिडियाचा वापर तू थांबव बाप्पा!