नक्षत्रांचे ‘कोरडे’ देणे, ठरतेय जीवघेणे

- संजीव उन्हाळे

पावसाने मोठा खंड दिल्यामुळे मराठवाड्यामध्ये दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. पाऊस पडेनासाच झाला आहे. पडतो तो सर्वदूर असत नाही. चिकलठाणा विमानतळ परिसरात आतापर्यंत १५० मिमी तर वाल्मीमध्ये २०० मिमी पाऊस पडला आहे. पावसाची ही तफावत शासनाच्याही लक्षात आलेली आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळाची बैठक झाल्याशिवाय पेरण्यांचा आकडा जाहीर करू नये असा फतवा शासनाने काढला आहे. मोठ्या प्रमाणावर खरीपाच्या पेरण्या झाल्या असल्या तरी पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. या भयावह परिस्थितीची तीव्रता लोकांपर्यंत जाऊ नये म्हणून सरकारने सांख्यिकी विभागाला पेरण्याची आकडेवारी देऊ नका असे बजावले आहे. स्कायमेट आणि आयएमडी या हवामानाचा अंदाज वर्तविणाNया संस्थांनी शंभर टक्के पाऊस पडणार असे जाहीर करून लोकांच्या आशा पल्लवित केल्या होत्या. हवामानतज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी मात्र यावर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडणार नाही असे भाकीत वर्तविले होते. महाराष्ट्र सरकारने मात्र याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. नांदेडचे हवामानशास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी मान्सून अजूनपर्यंत कोकणातच नाही तर मराठवाड्यात कोठून बरसणार असे मत व्यक्त केले आहे. जालना आणि औरंगाबाद या दोन जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रश्न काहीसा बिकट होईल, असा अंदाजही औंधकर यांनी व्यक्त केला आहे. कदाचित बाजारपेठेत उठावासाठी चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असावा. कमी पाऊस मराठवाड्याचा प्रश्न नसून दोन पावसातील खंड हे आहे. गेल्या साठ-सत्तर वर्षांत हवामान खाते खूप सुधारले असे म्हणतात. अमेरिकेत प्रत्येक शहरात किती वाजता, किती वेळ पाऊस पडणार याचा शंभर टक्के खरा अंदाज वर्तविला जातो. आपले हवामान खाते तेवढे पुढारलेले नाही. दोन पावसातील खंडाचा अंदाज वर्तविला तरी पुरे. या अंदाजाचाही शेतकNयाला आधार वाटेल. मराठवाड्यात गेल्या बावीस दिवसांपासून पाऊस नाही. दि एनर्जी रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच टेरीने आपला हवामान बदलाचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार औरंगाबाद जिल्हा राज्यात सर्वात जास्त संवेदनशील आहे. दुसरा नंबर लातूरचा, तिसरा क्रमांक उस्मानाबाद, पाचव्या नंबरवर नांदेड आहे. म्हणजे उजाडपणात तरी मराठवाडा अग्रेसर आहे. हवामान बदलाच्या तीव्रतेचा सामना करण्यासाठी आपल्याकडे कोणताही पर्याय उपलब्ध नाही. याउलट सांगली जिल्ह्याचे उदाहरण देता येईल. सांगली जिल्ह्यामध्ये शेडनेट, ठिबक सिंचन, जमिनीचे आरोग्य आदी साधनसुविधांच्या मदतीने हवामान बदलाच्या संकटाला तोंड देता येते. तशी परिस्थिती आपल्याकडे नाही.

अशा स्थितीतही ४९ लाख खरीप क्षेत्रापैकी साडेपस्तीस लाख क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या. त्यापैकी २७ लाख हेक्टर क्षेत्रावर तर पूर्व मोसमी पावसातच पेरणी झाली होती. पाऊस नसल्याने या सर्व क्षेत्रावरील पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे. मान्सून बरसल्यानंतर पेरण्या कराव्यात याबद्दल कृषी विभागाने फारशी जनजागृती केलेली दिसत नाही. दुबार पेरणीच्या धसक्याने रेणापूरच्या हनुमंत लहाने या शेतकNयाने आत्महत्या केली. या घडीला परभणी, जिंतूर, गंगाखेड, हिंगोली, कळमनुरी, औरंगाबाद, वैजापूर, गंगापूर, पैठण, जालना आदी भागात पावसाने ओढ दिल्यामुळे चिंतेचे ढग दाटून आले आहेत.

मराठवाड्यातील पावसाचे कोरडे दिवस या विषयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या डॉ.एस.एल. सनान्से आणि सत्यवान यशवंत यांनी संशोधन केले आहे. १९६०-२०१५ या ५५ वर्षांत मराठवाड्यातील पावसाच्या खंडात सातत्याने वाढ झाली आहे. पावसाचा खंड किमान १४ ते १६ दिवसांचा असतो. औरंगाबाद, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये सरासरी १४ दिवस पावसाचा खंड असतो. नांदेड, परभणी, हिंगोलीमध्ये सरासरी १६ दिवसांचा खंड असतो. पावसाचा खंड केवळ बीड जिल्ह्यामध्ये कमी आहे. जून, जुलैच्या पावसाच्या खंडाबद्दल इतके सुस्पष्ट संशोधन असतानाही त्याकडे कृषी विभाग कानाडोळा करीत आहे.

२०१०-२०१५ वर्षातील पावसाच्या खंडाच्या अभ्यासानुसार औरंगाबाद जिल्ह्यात २०१० मध्ये ३९ कोरडे दिवस होते. २०१५ मध्ये ही संख्या ८८ कोरड्या दिवसांपर्यंत गेली आहे. २०१४ मध्ये बीड जिल्ह्यात सर्वाधिक १०१ कोरडे दिवस नोंदविले गेले. २०१५ मध्ये औरंगाबाद ८८, बीड ८५, जालना ९५, लातूर ८२, उस्मानाबाद ७२, नांदेड ७०, परभणी ८८, असे कोरडे दिवस होते. पावसाचा हा खंड जिवघेणा आहे. तरीही कापूस आणि सोयाबीनसारखे पीक शेतकरी मोठ्या हिकमतीने टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. अरबी समुद्र, केरळ, कोकण, सह्याद्रीच्या पर्वतरांगा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा असा मान्सूनचा प्रवास होऊन असतो. यावर्षी जूनमध्ये पूर्व मोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली. या काळात १७२ मिमी पावसाची नोंद झाली खरी परंतु सध्या उत्तर भारतामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पावसाचे ढगंही तयार होत नाहीत. पावसाचा मोठा खंड पडल्याने कृषी अर्थव्यवस्थेसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

पावसातील खंड ही अपरिहार्यता शेतकNयांनी आणि शासनाने गृहीत धरली पाहिजे. पावसाने आपली रित बदलली आहे. त्याचा परिणाम पीक रचनेवरही झाला आहे. उडीद, मूग हे पीक जून-जुलैमध्ये घेतले जात असे. पण पावसाच्या खंडामुळे या दोन्ही पिकांचे क्षेत्र कमी झाले आहे. विभागात हलक्या प्रतीची जमीन जास्त आहे. मातीतील सेंद्रीय कर्ब घटलेले आहे. पावसाचा खंड वाढत असल्याने पिकांची धारणक्षमता आणि उत्पादन कमी झाली आहे. सद्यस्थितीत पावसाच्या खंडाला कसे सामोरे जायचे हाच प्रश्न आहे. उघडपीचे दिवस किती आणि पावसाचे दिवस किती याबद्दल हवामान खात्याने पूर्वसूचना देणेही आवश्यक आहे. अन्यथा २०१२ पासून मराठवाड्यात सुरू झालेली अवर्षणाची मालिका थांबविणे केवळ कठीण होणार आहे.