लातूर रेल्वे पळविली की दक्षिणद्वार उघडले?

- संजीव उन्हाळे

गतवर्षी लातुरवासियांना थेट रेल्वेने पाणीपुरवठा करणा-या रेल्वे विभागाने यावर्षी मुंबई-लातूर एक्स्प्रेस बीदरपर्यंत नेण्याचा आणि लातूर व्यापारी पेठेला दक्षिणद्वाराशी जोडण्याचा वेगळा पराक्रम केला. हा निर्णय लातुरकरांना मात्र पचला नाही, ते कमालीचे नाराज झाले. कारण, विलासराव देशमुखांचे वलय पुसून टाकण्याचा हा खटाटोप आहे. त्यासाठीच लातूर एक्स्प्रेसचे अस्तित्व अबाधित ठेवण्याचे आंदोलन पेटले आहे. या रेल्वेतून दररोज किमान हजार-बाराशे लोक स्वत:ला कसेबसे कोंबून मुंबईला जातात. तरी ती रेल्वे त्यांना आपली वाटते. मुळात लातूरकडे पाहण्याचा रेल्वे खात्याचा दृष्टीकोन आता बदलला आहे. लातूर, उदगीरसारख्या स्टेशनला ना कधी काही सुविधा दिल्या, ना प्रवाशांचे हाल बघून डबे वाढविले. कुणाच्या ध्यानी-मनी नसताना लातूर एक्स्प्रेस बीदरपर्यंत नेली. या निर्णयाला मराठवाडा जनता विकास परिषद, रेल्वे संघर्ष समिती तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचा विरोध होत आहे. त्यामुळे या आंदोलनाला वेगळा राजकीय रंग येत आहे.

विलासरावांनी महत्प्रयासाने सुरू केलेली लातूर एक्स्प्रेस भाजप सरकारने बीदरकडे पळविली, अशी लोकभावना असल्याचे आमदार अमित देशमुख यांचे म्हणणे आहे. ही रेल्वे बीदरपर्यंत धावणे बंद होत नाही तोपर्यंत लातूरकरांचे आंदोलन चालूच राहील असा इशाराही त्यांनी दिला आहे. मिरज ते लातूर या रेल्वेमागार्चे रुळ अक्षरश: रोजगार हमी योजनेतून बसविण्यात आले आहेत. १९०७ पासून या मार्गावर प्रथमत: निजामकालीन नॅरोगेज रेल्वे धावायची. ते रुळ बदलायला साठ वर्षे लागली. आम्ही ना उदगीरकरांच्या विरोधात आहोत ना कर्नाटकाच्या. लातूरकरांसाठी चालू केलेली ही रेल्वे लातूरच्या जनतेसाठी, इथला व्यापारउदीम वाढण्यासाठी वापरली जावी अशी आमची इच्छा आहे. लातूरहून दुसरी कुर्ला-बीदर रेल्वे सुरू झाली तरी त्याला आमचा विरोध नसेल पण, लातूर एक्स्प्रेस केवळ लातूरकरांच्या सेवेसाठीच राहिली पाहिजे अशी आमची आग्रही भूमिका आहे, असे आमदार अमित देशमुख म्हणाले. केंद्राने बीदरपर्यंत रेल्वे नेण्याचा निर्णय घेतला यामध्ये दिल्लीचे लोकप्रतिनिधी कमी पडले, अशी खासदार सुनिल गायकवाड यांचे नाव न घेता अमित देशमुख यांनी टीका केली.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी मात्र लातूरकरांना सबुरीचा सल्ला दिला आहे. ते म्हणतात, रेल्वेमध्ये जागा मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. लातूरकरांचा हा लोकक्षोभ मी समजू शकतो. तथापि, ही तात्पुरती अडचण आहे. लातूर ही मोठी बाजारपेठ आहे. लातुर दक्षिण भारताचे द्वार आहे. लातूर हे महत्त्वाचे जंक्शन होणार आहे. त्यामुळेच लातुर एक्स्प्रेस बीदरपर्यंत नेण्यात आली. शिवाय, जिल्ह्यातील उदगीर, उमरगासारख्या अनेक गावांचा समावेश करण्यात आला आहे. यासंदर्भात रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांच्याशी आपण चर्चा केली होती. यशवंतपूर-बीदर-मुंबई ही रेल्वे सुरू होणार असून त्यामुळे हा भाग थेट बंगळुरूशी जोडला जाईल. शिवाय, कुर्ला-बीदर ही रेल्वेही लवकरच सुरू होत आहे. भाजपचा एकंदर दृष्टीकोन व्यापक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांची ही मतमतांतरे पाहिल्यावर केंद्राने लातूरची रेल्वे पळविली की, बीदरला रेल्वे गेल्याने लातूरसाठी दक्षिणद्वार खुले झाले हे जनता ठरविल. तूर्त तरी या निर्णयाने अडचण झाली ती सर्वसामान्य प्रवाशांची. लातूर एक्स्प्रेसची साडेबाराशे प्रवासी क्षमता असताना तब्बल अडीच हजार लोक दररोज प्रवास करतात. या रेल्वेला आणखी सहा डबे जोडणे शक्य असताना उलट जनरलचे दोन डबे कमी करण्यात आले आणि आरक्षित दोन डबे वाढविले. यामुळे कमी पैशांत जनरल डब्यातून मुंबईचा प्रवास करणा-या सर्वसामान्य लातूरकरांची गोची झाली. लातूरच्या प्रवाशांना आगीतून पुâफाट्यात नेण्याचा हा अट्टहास कशासाठी असा लातूरकरांचा प्रश्न आहे. लातूरकरांचा हा राग सरकारला डबे वाढवून कमी करता आला असता किंवा या मार्गावर बीदरपासून मुंबईसाठी नवी रेल्वे सुरू करता आली असती. तसे झाले असते तर ती या सरकारची मोठी कर्तबगारी ठरली असती. बडेजावपणाही दाखवता आला असता. पण, सरकारला तसे करायचेच नाही. विकास नव्हे तर विकासाच्या नावाखाली एकमेकांचे पाय एकमेकांत गुंतवून त्यांना राजकारण करायचे आहे.  लातूर हे माझे आजोळ आहे आणि या शहराशी माझे जुने नाते आहे अशी मखलाशी बीदरचे खासदार भगवंत खुब्बाराव करतात. वास्तवात त्यांचा डोळा कर्नाटकाच्या आगामी निवडणुकांवर आहे. लातूरचे खासदार सुनिल गायकवाड यांचेही तेच. ते म्हणे उमरग्याचे. थेट गावातून मुंबई-दिल्लीला जाण्याची त्यांनी सोय केली. आपल्या गावाची सोय पाहण्यासाठी गायकवाड यांनी रेल्वेमंत्र्यांना पत्र दिले पण, लातुरकरांच्या तीव्र विरोधाचा त्यांना अंदाज आला नाही. आपल्या जिल्ह्याचा आणि गावाचा विचार करून सध्या रेल्वेची पळवापळवी जोरात सुरू आहे. औरंगाबादहून मुंबईला जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेस जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांनी जालन्यापर्यंत नेली. सोलापूर-जळगाव या प्रस्तावित रेल्वेमार्गातही बदल केला. वास्तविक, मराठवाड्यातून मुंबईकडे जाणाNयांची संख्या वाढत आहेत, त्यातुलनेत रेल्वेची संख्या कमी आहे. दक्षिण-मध्य रेल्वेने केवळ दक्षिणेतील साई भक्तांसाठीच रेल्वेची सोय केली आहे. याच जिल्ह्याचा भाग असलेल्या उदगीरकरांचे काय, याच्याशी कोणालाच देणेघेणे नाही. रेल्वेचे जाळे वाढविण्याचा आणि लातूरला दक्षिणेशी जोडण्याचा उदात्त हेतु यामध्ये मानला तरी यामुळे लातूरकरांच्या हालअपेष्टा वाढल्या, ही गोष्ट नाकारून कशी चालेल? लहान रेषेशेजारी मोठी रेषा ओढून एखाद्याचे खुजेपण दाखवता येते. बिरबलाचा हा पवित्रा भाजपा सरकारलाही घेता आला असता. सकारात्मक राजकारणात तेच परवडणारे असते. लातूर एक्स्प्रेसला पळविण्याच्या ऐवजी दक्षिणद्वार उघडणारी स्वतंत्र रेल्वे सुरू झाली तर त्यामध्ये भाजपचे मोठेपणच दिसेल.