कुलगुरू नाहीत विद्यापीठात...
- संजीव उन्हाळे
आदरणीय कुलगुरू चोपडेसर, आपल्यासारख्या
उत्कृष्ट शास्त्रज्ञाने या विद्यापीठाचे कुलगुरू व्हावे यासारखे आमचे दुसरे भूषण
नाही. या विद्यापीठाच्या परंपरेतले आपण तिसरे संशोधक कुलगुरू आहात. भारतीय
विद्यापीठ संघटनेकडून आपल्या कार्याची दखल घेत उत्कृष्ट राष्ट्रीय शिक्षण
पुरस्कारांनी आपणाला सन्मानित करण्यात आले आहे. आपला हा दैदिप्यमान बायोडाटा
पाहूनच आपण कुलगुरू झालात आणि पहिल्या वर्षामध्ये शिक्षणक्षेत्र, स्थानिक
राजकारणी आणि विद्यार्थ्यांकडूनसुद्धा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला. आपला हा
बायोडाटा आणखी दिव्यत्वाकडे नेण्याचा आटापिटा चालला असल्यामुळे आपणाला म्हणे
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षापासून केंद्रीय विद्यापीठांच्या
कुलगुरूंपर्यंत अनेक संधी आहेत. त्याबद्दल मराठवाड्याच्या संतभूमीला नेहमी आनंदच
वाटेल. पण यामुळे वर्षभरापासून आपल्याला विद्यापीठासाठी वेळच देता येत नाही.
सातत्याने परदेश दौरे, कोणत्या ना कोणत्या समित्यावर उपस्थिती या
माध्यमातून आपणाला देशभ्रमणच नव्हे तर परदेशाटन करावे लागत आहे. शेवटी
कुलगुरूंच्या उपस्थितीचा एक धाक असतो, तो धाकच राहिला नाही. त्यामुळे जिकडे-तिकडे आनंदी आनंद
आहे.
कुलगुरू महोदय, कुलगुरूंचे
प्रशासकीय नेतृत्व हे परीक्षा नियंत्रण आणि सुयोग्य अध्यापन याच्या दर्जेदार
शिक्षणापासून ठरते. आपण आल्यापासून तीन-चार वेळा परीक्षा नियंत्रक बदलले. अजूनही
परीक्षेची घडी बसलेली नाही. अडीच वर्षांपासून पीएचडीची पेट परीक्षा झालेली नाही.
बारकोड उत्तरपत्रिका खरेदीचा ७४ लाखांचा घोटाळा झाला. त्याचे काय झाले, हे
अजूनही कळले आहे. आपल्या कार्यकाळामध्ये किमान डझनभर प्रभारी कुलसचिव झाले. अनेक
वेळा जाहीरात येऊनही म्हणे मनासारखा कुलसचिव मिळाला नाही. त्यामुळे विद्यापीठाच्या
निधीतून कुलसचिवाचे पद चालवावे लागते. विद्यापीठ आणि महाविद्यालय विकास मंडळाचे
प्रमुख पदही प्रभारीच आहे. विद्यापीठामध्ये प्राध्यापकांच्या शंभर तर शिक्षकेतर
कर्मचाड्ढयांच्या किमान अडीचशे जागा रिक्त आहेत. पुन्हा यावर्षी निवृत्त होणाड्ढया
प्राध्यापकांची संख्या मोठी आहे. त्यापैकी यावर्षी बरेचशे प्राध्यापक नामांकित
असल्यामुळे नवखी मंडळी कारभार कसा करणार हा खरा प्रश्न आहे. साडेचारशे रोजंदारी
कर्मचाड्ढयांचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. पण आपल्या बंगल्यावरचे कर्मचारी म्हणे
तसेच भरण्यात आले. असा सगळा आलबेल कारभार चालला आहे. आपण वातावरण दौड्ढयाच्या
निमित्ताने स्पेन, इटली, अमेरिका पाहिले. पण तिथले वातावरण
वेगळे. आपल्या विद्यापीठात विद्यार्थ्यांना प्यायला साधे पाणी नाही. अधिकाड्ढयांना
पाण्याचे जार, आणि विद्यार्थी मात्र बेजार हा विरोधाभास.
विद्यापीठाचा सव्वासातशे एकराचा परिसर हा एक सुंदर पाणलोट आहे. माथ्यापासून
पायथ्यापर्यंत पाणी अडविण्याचा प्रयत्न झाला तो कागदावरच. विद्यापीठ परिसरामध्ये
एकही अद्ययावत उपहारगृह नाही. नागनाथ कोतापल्ले यांनी अतिक्रमणे मोडून काढली होती.
पण ही अतिक्रमणे आणि तीच माणसे पुन्हा बसली आहेत. याकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळ
कुठे आहे? असे म्हटले जाते की नरेंद्र जाधव, भालचंद्र
मुणगेकर, सुखदेव थोरात, अरूण निगवेकर असे आपले आदर्श आहेत. ही
बाब भूषणावह आहेच, पण त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपल्याला पुढे
जायचे असेल तर या विद्यापीठातील आपल्या अनुपस्थितीमुळे निर्माण झालेले वातावरण
आपणाला अगोदर सुधारावे लागेल. हे आम्ही यासाठी म्हणतो की केवळ तीन-चार अधिका-यांना
‘यह वतन तुम्हारे हवाले साथियों’ असे सोपवून आपण
जाता आणि सगळी परिस्थिती अधांतरी राहते, अशी स्थिती आहे.
कुलगुरू महोदय, अगदी
प्रारंभीच्या काळात आपण भारतीय राज्य घटनेचा एक विषय सर्व अभ्यासक्रमांना ठेवला.
त्यामुळे किमान विज्ञान शाखेसह सर्वांनाच भारतीय घटनेचे ज्ञान तरी झाले.
सत्तांतरानंतर स्वाभाविकपणे आपल्या भोवती असलेले कोंडाळेही म्हणे बदलले. आता तर
संघ परिवारातील जुनी जाणती आणि नवखी मंडळी संपर्क प्रमुख म्हणून आपल्याला
मार्गदर्शन करीत असतात. पण आपण विद्यापीठात हजरच नसल्याने हीच मंडळी कारभार
चालवितात. आश्चर्य म्हणजे वक्तशीर असलेली ही मंडळी आपणाला विद्यापीठात आपल्या
उपस्थितीने मोठा फरक पडेल हे का सांगत नाहीत? सध्या
विद्यापीठातील अध्यापन पार ढेपाळलेले आहे. अगदी मोजके प्राध्यापकच वर्गावर हजर
असतात. डॉ. विजय पांढरीपांडे यांनी आपल्या कार्यकाळात काही भौतिक आणि प्रशासकीय
सुधारणा घडवून आणल्या. विद्यापीठाला नॅकचा ‘अ’ दर्जाही
मिळवून दिला. स्वत: वर्गात जाऊन शिकविले, पण आता सारे बदलले आहे. असेच चालत
राहिले तर या विद्यापीठाला ‘अ’ दर्जा राखणे
सुद्धा अवघड होईल. नॅकला अवघ्या दिड-दोन वर्षात सामोरे जावे लागत आहे. लक्षणीय बाब
अशी की देशातील पहिल्या शंभर विद्यापीठात कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा
समावेश झालेला आहे. मात्र आपल्या विद्यापीठाचा ८७ वा क्रमांक लागतो. नामविस्तारानंतर २०१८-१९ मध्ये विद्यापीठाचे
रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करण्याची जबाबदारी आपणावर पडणार आहे. त्यावेळी २५
वर्षांच्या विद्यापीठाच्या प्रगतीचा लेखाजोखा द्यावा लागेल. त्यामुळे उरलेल्या
कार्यकाळात तरी आपण या विद्यापीठाला वेळ द्यावा, कुठल्या
कोंडाळ्यात अडकू नये, दिलेली आश्वासने प्रत्यक्षात कशी उतरतील हे
पाहावे. या तळमळीतूनच हे चार शब्द लिहावेसे वाटले. नाही तर लोक म्हणतील, ‘कुलगुरू
नाहीत विद्यापीठात, जो तो सांगतो बाहेर गेले आत्ताच.....’