नोटावर सरकारी टाच अन् जिवाला जाच


 

गांधीजी, आपण खरोखरच थोर आहात. नोटाबंदीच्या कथित अर्थक्रांतीत नव्या नोटांवर तुम्ही टिकून आहात. तुमचा दूरदर्शी समृध्द भारताचा स्वप्न पाहणारा चष्मा आता स्वच्छ भारताचे बोधचिन्ह झाले आहे. तो चष्माही या नोटेवर आहे. इतर गांधींना मात्र आता काळाच्या पडद्याआड ढकलून दिले आहे. ८/११ च्या आर्थिक सर्जीकल स्ट्राईक म्हणजेच निश्चलनीकरणाचा पंतप्रधानांनी असा हाबाडा दिला की नोटांची साठेबाजी करणा-या मंडळींची झोप उडाली. हे सरकार इव्हेंटप्रिय असल्यामुळे काळाबाजार रोखण्यासाठी या सरकारचा पन्नास दिवसांचा मॅगाइव्हेंट सध्या सुरू आहे. जुना पैसा झाला खोटा, बँक रांगांचा इव्हेंट मोठा. तसा काळा पैसा जमिनी, सोने व परदेशी बँकांतच जास्त. या नोटांमध्ये ३ टक्के काळा पैसा दडलाय पण सरकार काळ्या पैशाविरुद्ध अशी लढाई करीत आहे की शंभर टक्के जनतेला वेठीस धरले आहे. अगदी चारच दिवसांत तुमच्या संकल्पनेतला शेवटचा माणूस रस्त्यावर आला. पैशासाठी बँकांकडे रांगा वाढल्या. बाजार थांबला, रोजगार नडला. गरीबांचे हालच हाल झाले. बडी मंडळी छोट्यांना रांगेत उभी करू लागली. म्हणून हाताला शाईही लावली गेली. या खेळामध्ये बँकांकडे बचतीच्या भल्या दांडग्या रकमा जमा झाल्या. शेवटी आया-बायांनी अडीनडीला कामाला येतील म्हणून गाडग्यामडक्यात लपवलेल्या नोटा शेवटी नवरेमंडळीच्या स्वाधीन कराव्या लागल्या. बचत हा भारतीय मनाचा स्थायीभाव आहे. म्हणून गादीखाली दडवलेला पैसा काळा नसतो. बेहिशेबी काळा पैसा कसा असतो हे अनेकांना माहीत नाही. पण यामुळे अनेक लग्नं अडचणीत आली, खाजगी दवाखान्यात हाल झाले अशा कितीतरी अडचणी. सर्वसामान्यांच्या खिशात असलेली पाचशे रुपयांची नोट गेली आणि दोन हजाराची नवी नोट आली. त्याचीही चिल्लर मिळेना. पुन्हा गुलाबी नोट परत करण्यासाठी बँकांकडे रांगा वाढल्या. असा मोठा बोलबाला तुमच्या दोन हजाराच्या नोटेचा झाला.

गांधीजी, आपण खेड्याकडे चला असा संदेश दिला होता. पण आता स्मार्ट सिटीचा जमाना आला आहे. खेडी आता उजाड झाली, त्यात या नोटाटंचाईने अधिक भकास होऊन गेली. खरं तर ४० टक्के ग्रामीण भाग बँकांशी अद्यापही जोडलेला नाही. मराठवाड्यासारख्या भागात तर सहकारी बँकांचे मोठे जाळे आहे. घरच्या बँका समजून म्हणे     पुढा-यांनी आपला बक्कळ काळा पैसा त्यात टाकून दिला. याची कुणकुण लागताच रिझव्र्ह बँकेने नोटा जमा करण्यास जिल्हा सहकारी बँकांवर बंदी घातली. त्यामुळे तर सामान्यांची आणखीनच अडचण झाली. घोषणा     शेतक-याचे उत्पन्न दुप्पट करण्याची आणि प्रत्यक्षामध्ये पावलोपावली कोंडी असा प्रकार आहे. सध्या शेतक-यांचा मका, सोयाबीन, बाजरी व कांदा विक्रीसाठी तयार आहे. पण सगळ्या बाजारपेठा बंद आहेत. दारात मजूर आणि घरात त्याला द्यायला पैसे नाहीत. एका शेतक-याने तर आत्महत्या केली. आतातर शेतकरी इतका हवालदील झाला आहे की, उधारीने मंडईमध्ये अडत्याला भाजी द्यायला तयार आहे पण, तो घ्यायला तयार नाही. कारण, ग्राहकांकडे चिल्लर नसल्याने मागणीत मोठी घट झाली आहे. त्यातल्या त्यात हा निर्णय सुगीच्या मुहूर्तावर घेतल्यामुळे हालअपेष्टा वाढल्या आहेत. जिथे अनेक शेतक-यांकडे चेकबुक नाहीत तिथे एटीएमचे कार्ड असणार कुठून? शिवाय खेड्यातील एटीएमही बंद आहेत. ग्रामीण जनतेला प्रत्येक दिवस काढणे कठीण होत आहे तिथे पन्नास दिवस कसे काढावेत हा खरा प्रश्न आहे.

 ‘उचललेस तू मीठ मूठभर, साम्राज्याचा खचला पायाअसा गांधीजी आपला महिमा होता. आपल्या नोटबंदीने देशाच्या आर्थिक साम्राज्याचा पाया हलतो की काय, हे माहीत नाही पण जमीन व्यवहाराचा पाया मात्र हलला आहे. विनोबाजींनी भूदान चळवळ राबविली. इथे इंच-इंच जमिनीत काळा पैसा रिचवल्याने धनदांडग्यांना बळ आले आहे. या निर्णयाने जमिनीच्या व्यवहारावर बराच मोठा परिणाम होणार आहे. देशाच्या आर्थिक व्यवहारात ११ टक्के हिस्सा बांधकाम व्यवसायाकांचा आहे. असे म्हणतात की, ३० लाख कोटी रुपये हे जमीन व्यवहारात गुंतलेले आहेत. जमिनीचे व्यवहार रोखीनेच होतात. ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईटचा खेळ आता फारसा जमणार नाही. त्यामुळे जमिनीची उलटापालटी करण्याचे प्रकारही थंडावणार आहेत. नोटाबंदीच्या या निर्णयाने महागाई काही प्रमाणात नियंत्रणाखाली येईल, कर्ज स्वस्त होईल. जुन्या नोटेवरही आपले छायाचित्र होते. पण नोटांच्या साठेबाजामुळे आपला दम कोंडला जायचा. आता पैसा वाहता राहील. पण सध्या सर्वसामान्य माणूस अडचणीत सापडलेला आहे, त्याची सुटका केव्हा होणार, हे उमगत नाही.

गांधीजी, तुम्हाला माहिती नाही, सत्तर वर्षांमध्ये भारतीय माणूस पळवाटा काढण्यामध्ये किती तरबेज झालेला आहे. ज्यांच्याकडे काळापैसा त्यापैकी एकही बँकेच्या रांगेमध्ये नाही. काही मंडळींनी तर आपल्या संस्थेतील कर्मचा-यांच्या नावाने रक्कम टाकून दिली आणि नोटा बदलून नंतर परत करण्याचा दमही दिला. सध्या निवडणूकांचा मोसम असून उमेदवारांनी अगदी आरटीजीएस करून मतदारांच्या नावाने रक्कम अदाही केली आहे. अशा एक ना अनेक पैशाला वाटा फुटल्या. नाही म्हणायला महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांची या निमित्ताने चांदी झाली. बरे झाले देवा! अनेक देवस्थानाच्या दानपेट्यांना कुलूप ठोकल्यामुळे उघड्या डोळ्याने काळा पैसा पाहण्याची वेळ आली नाही.

गांधीजी, कुसुमाग्रजांच्या एका कवितेमध्ये आपण व्यथित होऊन आपल्या मागे केवळ सरकारी भिंत आहे असे म्हणाला होतात पण, या देशातील सामान्य माणसाचे खरेखुरे प्रतिनिधी आपण आहात. काळ बदलला, राज्यशकट बदलला तरी तुमचे महत्त्व केवळ नोटेपुरते नाही तर तुम्ही सांगितलेला शब्द ना शब्द आज ना उद्या खरा ठरणार एवढे खरे.