संसर्गाचा सारीताप, त्यात करोनाचा सारीपाट

-- संजीव उन्हाळे

राज्यभर करोनाचे थैमान असतानाच, तुलनेने कमी संसर्गजन्यता असूनही करोनाशी तंतोतंत साधम्र्य असलेला सिव्हीअर अ‍ॅक्युट रेस्पिरेटरी इन्फेक्शन म्हणजेच सारी हा आजार मराठवाडा आणि विदर्भामध्ये वाढत आहेत. तथापि, करोनापेक्षा या तीव्र वेदनादायी सारीमध्ये श्वसनसंस्थेची संसर्गबाधा झाल्याने मृत्युचे प्रमाण जास्त म्हणजे किमान १५ टक्के आहे. राज्यभर या सारी आजाराने बाधित रूग्णाचे शासनाने सर्वेक्षण केले असून त्यामध्ये . टक्के करोनाबाधित रूग्ण सापडले आहे. अगदी अलिकडे तर शासनाने सर्व खासगी डॉक्टरांना सारीचा रूग्ण सापडला तर अगोदर सरकारी हॉस्पीटलमध्ये पाठवण्याचे आदेश तर दिले पण सगळे उपचार आणि बडदास्त ठेवता-ठेवता नाकी नऊ आले आहे. अनेक शासकीय रूग्णालयात सारी रूग्णांची मोठी गर्दी वाढली असून मृत्युचे प्रमाणही वाढत चाललेले आहे.

                गेल्या महिनाभरापासून या सारी रूग्णाची संख्या वाढत असून औरंगाबादेत या आठवड्यात चौदा जणांचा बळी गेला आहे. औरंगाबादचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी या आजाराचे गांभीर्य ओळखले आणि यासंदर्भात बैठक घेवून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ताप उपचार केंद्र सुरू करण्याचे आदेश जारी केलेले आहे. कोविड केअर सेंटरचा ताप उपचार केंद्र हा एक भाग असून आता सार्वजनिक आरोग्य विभागाने बांधून पूर्ण केलेल्या पण अद्याप वापरात नसलेल्या इमारती, स्टेडियम, हॉटेल याठिकाणी आता सारी ताप असलेल्या रूग्णालासुध्दा दाखल करण्यात येईल. वस्तुत: करोनाचा निगेटीव्ह अहवाल येवूनही जर ताप, श्वसनाचा आजार दिसून आला तर त्याला सारी रूग्ण म्हणून दाखल करण्यात येते. असेही घडले आहे की, अगोदरचा निगेटीव्ह अहवाल नंतर पॉझिटिव्ह आढळला. मग करोनाचा रूग्ण म्हणून एकच धांदल उडते. यामुळे अगदी अलिकडे सारीसाठी दाखल करण्यात आलेल्या रूग्णांना प्रथम करोनाचे औषधोपचार चालू करणे आवश्यक आहे. एवढेच नव्हे तर रूग्णालयात दाखल झालेला कोणताही सारीचा रूग्ण हा करोना पॉझिटीव्ह आहे, असे समजूनच सर्व उपाययोजना करणे अत्यावश्यक झाले आहे, असे ज्येष्ठ डॉक्टर मंगला बोरकर यांनी सांगितले.

                वस्तुत: सारी हा काही वेगळा आजार नाही तर तीव्रतम श्वसन संस्थेचे आजार, शीतज्वर  या संसर्गजन्य आजारांच्या समुहाला साकल्याने सारी असे संबोधण्यात येते. त्यामध्ये स्वाईन फ्ल्यु, बॅक्टेरीयल इन्फेक्शन, फ्ल्युपासून अगदी अलिकडे आलेल्या करोनाचाही समावेश होतो. मुळामध्ये न्युमानिया या आजारामध्ये अनेक रूग्ण मृत्युमुखी पडत होते. पण त्याची माध्यमांनी कधीच गंभीरपणे दखल घेतली नाही. करोनाच्या आगमनानंतर या आजाराला विशेष महत्त्व आले आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सारीची लक्षणे आणि करोनाची लक्षणे एकसारखीच आहेत. दम लागणे, ताप येणे, श्वासोच्छवासास त्रास होणे, खोकला यापासूनच दोन्ही आजारांची सुरूवात होते. केवळ सारी हा आजार कमी संसर्गजन्य आहे एवढेच. आजारांची लक्षणे एकच पण उपचार वेगळे आहेत. जागतिक तापमान वाढीमुळे सारीच्या विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत आहे, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. याघडीला महाराष्ट्रातील आठ जिल्हे, तामिळनाडू, गुजरात, केरळ आदी राज्यातही सारीने हात-पाय पसरलेले आहे. कोविड संसर्गाचा प्रादुर्भाव वयस्कर मंडळींना लवकर होतो, तसे सारीचे नाही. लहान मुलांपासून मध्यमवयीन माणसांपर्यंत सारीचा संसर्ग झालेला दिसतो.

                मुंबईहून आलेले पांडु तुकडोजी बोर्डे देवळाई चौकामध्ये राहिले. त्यांना न्युमोनिया झाला. त्यामुळे सारी वॉर्डामध्ये दाखल करण्यात आले. शेवटच्या क्षणी आलेल्या अहवालामध्ये बोर्डे करोनाबाधित आहे, असे लक्षात आले. त्यानंतर श्वासोच्छवासक लावला, पण काही उपयोग झाला नाही. पांडु बोर्डे यांना न्युमोनियाचे रूग्ण समजून घरातील सर्वांनी संपर्क ठेवला आणि चार जणांना न्युमोनियाची बाधा झाली. स्टेट बँक ऑफ इंडियातील एका व्यवस्थापकाला अशाच पध्दतीने सारीचा रूग्ण म्हणून दाखल केले आणि करोनाबाधित झाल्यानंतर अल्पावधीत मृत्यु झाला. अशा कितीतरी सारी-करोनाच्या कथा.

                इंडियन कौंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) अगदी अलिकडे कोविड-१९ संदर्भात केलेल्या संशोधनामध्ये असे लक्षात आले आहे की, सारीच्या रूग्णामध्ये कोविड-१९ चे रूग्ण सापडतात. ५९११ सारी रूग्णामध्ये १०४ करोना पॉझिटीव्ह रूग्ण सापडले असून सारीच्या पुरूष रूग्णामध्ये करोना सापडण्याचे प्रमाण जास्त आहे. जवळपास ४० टक्के न्युमोनियासदृश आजार असलेल्या सारी-करोना संशयित रूग्णामध्ये परदेशी पर्यटनाचा इतिहास नाही. तरीही करोना पॉझिटीव्ह रूग्ण सापडले. आयसीएमआरने केलेल्या या संशोधनामध्ये महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यातील ५५३ सारी रूग्णांचा अभ्यास केला असता २१ करोनाचे पॉझिटीव्ह रूग्ण सापडले. आयसीएमआरच्या अहवालात सर्वाधिक सारीचे रूग्ण गुजरात आणि त्यानंतर तामिळनाडू, महाराष्ट्र आणि केरळमध्ये आढळले. सारीच्या संसर्गजन्य आजाराच्या गटामध्ये आता करोनाचा समावेश अपरिहार्य झाला आहे.

                अगोदरच सगळी जनता लॉकडाऊनने हैराण आहे. त्यात कोणत्या एखाद्या भागामध्ये करोनाचा रूग्ण निघाला की, पोलीस व्यवस्था कडक होते. त्या सगळ्या यातनातून मार्ग काढत असताना मध्येच सारीचा हा सारीपाट काही वेगळाच आहे. सारीचे रूग्ण हे केवळ शहरापुरते मर्यादित नसून ग्रामीण भागातूनसुध्दा मोठ्या प्रमाणावर येत आहेत. अगदी खेड्यातील सामान्य खासगी डॉक्टरसुध्दा सध्या सारी रूग्णाची जोखीम घ्यायला तयार नाही. त्याला तात्काळ जिल्हा रूग्णालयाची वाट दाखविण्यात येते. अगोदरच करोना आणि त्यात हा सारीताप. प्रश्न एवढाच आहे की, शासनाच्या आरोग्य विभागाकडे मर्यादित मनुष्यबळ आहे आणि अशा तोकड्या मनुष्यबळाच्या जोरावर करोनाप्रमाणेच सारीच्या रूग्णाची व्यवस्था ठेवणे, हे मोठे आव्हान आहे. या सारी रूग्णापैकी एकही रूग्ण करोनाबाधित असेल तर आरोग्य कर्मचा-यांचे भविष्यही टांगणीला लागल्यासारखे होणार आहे. करोनाच्या पार्श्वभुमीवर सारी रूग्णाची काळजी घेणे जोखमीचे पण अनिवार्य आहे.