आला कोरोनाचा विषाणू, गेला औषधींचा प्राणवायू

- संजीव उन्हाळे
चेन्नईनंतर औरंगाबाद हे भारतातील महत्त्वाचे 'फार्माहब' आहे. औषधी निर्मितीसाठी लागणारे ८० टक्के एपीआय चीनकडून आयात करतो. हे मोठे पारतंत्र्य आहे. ’कोरोना विषाणू’चा हा फटका औषधी कंपन्यांना बसला. अगदी पॅरासिटेमॉलपासून जेनेरीक औषधींच्या किंमती दुप्पटीने वाढल्या आहेत. खरंतर, कोरोनाच्या या आपत्तीला आपल्या कंपन्यांनी इष्टापत्तीमध्ये बदलले पाहिजे. स्वस्ताईच्या चीनी मृगजळाच्या मागे धावण्यापेक्षा देशी हातांना काम देवून मोठा बदल घडविण्याची हीच वेळ आहे.
आपल्याकडे कोणत्या गोष्टीने कोणाची डोकेदुखी वाढेल हे सांगता येत नाही. पण कोणाचेही डोके दुखले की तो सहजपणे स्वस्तातले पॅरासेटेमोलची गोळी घेऊन एक झोप काढायचा अन् मोकळा व्हायचा. आता पॅरासेटेमोल स्ट्रिपची किंमत दुप्पट होणार आहे. एव्हढेच नव्हे तर केंद्र शासनाने गवगवा केलेल्या जेनेरिक मेडिसीन पैकी ५८ औषधी प्रचंड महाग होणार आहेत. याला कारण आहे चीनभर पसरलेला कोरोना विषाणुंचा जीवघेणा आजार. या आजारामुळे चीनमध्ये किती मृत्यू झाले हे बिजिंगच्या तटबंदी भिंतींनाच माहित पण त्याचा परिणाम मात्र आता सर्व देशांना भोगावा लागणार आहे.
त्यातल्यात्यात औरंगाबाद औद्योगिक वसाहतीला मोठा फटका बसणार आहे. आपले शहरवासीय औरंगाबाद की संभाजीनगर याच विषयावर चघळून चर्चा करत आहे. पण जायकवाडीच्या मृदयुक्त पाण्यामुळे हे शहर बिअर कॅपिटल ऑफ इंडिया कधी झाले हे कळलेच नाही. तशीच बात औषधी निर्मिती कारखान्याची. कोरडे हवामान या औषधी कंपन्यांना पोषक असते. त्यामुळे तब्बल २० मोठ्या आणि तितक्याच मध्यम औषधी कंपन्या औरंगाबादेत उभारल्या गेल्या. अनेक औषधी कंपन्यांचे मोठे ब्रँड या शहरात आहेत. त्यात अभिमानाची गोष्ट अशी की एखाद दुसरी वंâपनी सोडली तर जवळपास सर्वच कंपन्या आपल्या औषधी औरंगाबादेतून इतरत्र निर्यात करतात. चेन्नईनंतर देशामध्ये विकसित झालेले औरंगाबाद हे एकमेव फार्मा हब आहे.
औषधीशास्त्रामध्ये शल्यचिकीत्सीय सर्व गोष्टींमध्ये भारत स्वयंपूर्ण आहे. कॉटन, वूल आणि बँडेजचा तर तोटाच नाही. खरी गोम आहे ती अशी की, कोणतीही गोळी तयार करायची असेल तर त्यासाठी अ‍ॅक्टिव्ह फार्मासिटीकल इनग्रिडीएन्टस् (एपीआय) म्हणजे क्रियाशील औषधी घटक लागतात. हे घटक असल्याशिवाय ना कॅप्सुल तयार होते ना डोकेदुखीची गोळी. आता अस्थमा झाला तर म्हणावे लागेल ’’थांबा! औषधी घटक चीनहून येत आहेत.’’ इतके भारताला चीनवर सर्वस्वी अवलंबून रहावे लागते. भारतामधील औषधी कंपन्यांना निर्यात करणा-या चीनमध्ये जवळपास तीन हजार कंपन्या आहेत. भारतात त्यापैकी अठ्ठावन्न घटक आयात केले जातात. अगदी अ‍ॅमोक्सिलीन, टेट्रासायकलीन, डॉक्सिसायकलीन, अ‍ॅझिथ्रोमायसीन, नॉरफ्लॅक्सिन इथपासून व्हीटॅमीन सी, व्हीटॅमीन बी-६, व्हीटॅमीन बी-१, व्हीटॅमीन बी-१२ सुध्दा चीनमधून मागविण्यात आपला देश अग्रेसर आहे. जवळपास दोन दशलक्ष टन एवढे घटक केवळ जहाजाद्वारे भारतात येतात. १३० कोटींचा देश त्यामुळे औषधांचा वापर जगाच्या तुलनेत दुप्पटीने वाढलेला आहे. आपण इतके औषधखाऊ की, २०१८ मध्ये १७ दशलक्ष डॉलरचा व्यवसाय चीनने केला. गणेश उत्सवापासून ते होळीच्या पिचका-यापर्यंत आपण चीनवर अवलंबून आहोतच. अगदी लहान मुलांची खेळण्याची दुकानेसुध्दा चीनी स्टॉक संपताच बंद पडणार आहेत. पण साध्या औषधाच्या घटकांची निर्मिती आपल्याकडे होवू नये, यासारखे दुसरे लांच्छन नाही. मोठ्या राणाभीमदेवी थाटात केंद्र सरकारने जेनेरीक औषधाची वेगळी चूल मांडली. पण, याघडीला महिनाभर पुरेल एवढाच साठा म्हणे उपलब्ध आहे. या आपत्तीला संधीमध्ये बदलण्याऐवजी चो-या-मा-या करून माल विकण्यासाठी साठेबाज तयारच आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे इतकी आपत्ती ओढवूनही चीन भारताकडे ढुंकून पहायला तयार नाही. उलट, ६ फेब्रुवारी रोजी झालेल्या नीती आयोग आणि औषधी कंपन्यांच्या संयुक्त बैठकीत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी समितीने चीनमधून भारतात येणा-या प्रतिजैवके, डायरिया, व्हिटॅमीन्स आणि हार्मोन्स थेरपीसाठी लागणा-या औषधींची मागणी केली, पण ती धुडकावून चीनने कोणतेही औषधी घटक या स्थितीत भारताला दिले जाणार नाही, असे सुनावले. एवढेच नव्हे तर कोरोनामुळे चीनने आपल्या देशातील कंपन्यांवरही बंदी घातली आहे. त्यावर भारत सरकारने रसायने आणि खते मंत्री यांच्या नेतृत्वाखाली भारतातील औषधी उत्पादन वाढविण्यासाठी टास्कफोर्सची निर्मिती केली आहे. आता या आपत्तीला संधीमध्ये बदलण्याचे काम हे भारतीय उद्योजकांचे आहे. केवळ चीनी औषधी घटक स्वस्तात मिळतात म्हणून गोळ्या आणि कॅप्सुल भरण्याचे काम तेवढे आपल्याकडे चालते आणि आम्ही मोठ्या ऐटीने औषधीनिर्मितीशास्त्र म्हणून त्याला ओळखतो. वानगीदाखल सांगायचे तर औरंगाबादच्या एफडीसी औषधीनिर्मिती कंपनीत ओआरएस पावडर निर्माण केली जाते आणि ती जगभर निर्यात केली जाते. या पावडरचे घटकसुध्दा शुध्द औरंगाबादी आहेत.
आता औषधी निर्मिती विभागाने जारी केलेल्या एका आदेशामध्ये ३ मार्चपर्यंत कोणती कंपनी ५८ घटकापैकी चीनमधून माल आयात करते, याची माहिती मागितली आहे. एखाद्या माणसाच्या शरीरावर सूज आलेली असेल, तरी आपण त्याला ठणठणीत आहे, असे म्हणणे फसवेपणाचे आहे. तसेच आपल्या औषधी उद्योगाचे झाले आहे. कोरोनामुळे हे इंगित उघडकीस आले आहे. पण, केवळ चीनी माल स्वस्तात मिळतो म्हणून ’भर अब्दुल्ला गुड थैलीमे,’ असे सदा सर्वकाळ चालणार नाही. शेवटी केंद्र सरकारला पायाभूत सुविधा इतकेच औषधीनिर्मिती उद्योगाची मुळापासून वाढ कशी होईल, याची काळजी घेणे गरजेचे आहे. गेल्या दशकामध्ये औषधी घटकात अमेरीका जगात आघाडीवर होते. किंमतीच्या स्पर्धेत अग्रेसर राहून चीनने हा पहिला क्रमांक मिळविला. विशेषत: चीनमध्ये या कंपन्यांनी पर्यावरणाचे सर्व कायदे पायदळी तुडविले. पंतप्रधानांच्या परवलीच्या शब्दाप्रमाणे १३० कोटींच्या देशामध्ये औषधी घटक निर्माण करणे खरोखरच इतके अवघड आहे काय ?