साई जन्मभूमी पाथरी !, ठेवा श्रध्दा आणि सबूरी

संजीव उन्हाळे

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पाथरीला साई जन्मस्थानाच्या विकास आराखड्यासाठी शंभर कोटी रूपयाची घसघशीत मदत जाहीर केली. त्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पाथरी हेच सार्इंचे जन्मस्थान असल्याचा निर्वाळा दिला. साई जन्मस्थानाच्या निमित्ताने समांतर तिर्थक्षेत्र उभे राहते की काय, या शंकेने शिर्डीकरांनी थेट आंदोलनाचे हत्यार उपसले. पाथरीकरांना ती श्रध्दाभूमी वाटली तरी इतरांना त्यामागचे अर्थकारण दिसू लागले. साईबाबांच्या शिर्डीची महती जगभर असून जन्मस्थानाच्या वादावरून संकुचित वृत्तीचा डाग लागू नये, यासाठी वेळीच मनाचा मोठेपणा दाखविणे गरजेचे आहे.

        शिर्डीचे साईबाबा यांचे जन्मस्थान परभणीतील पाथरी असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या पवित्र स्थानाला अगदी अलिकडे औरंगाबाद मुक्कामी शंभर कोटींचे अर्थसहाय्य करण्याचा मनोदय जाहीर केला. यामुळे शिर्डीची मंडळी अस्वस्थ झाली. अगदी शिर्डी बेमुदत बंद करण्याची आंदोलनाची भाषाही सुरू झाली. या अगोदर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही साईचे जन्मस्थान पाथरी असल्याचे सांगितले होते. तेव्हा काही राजकारणी मंडळी खुलासा करण्यासाठी त्यांच्या भेटीला गेले होते. वस्तुत: राष्ट्रपती असो की मुख्यमंत्री, त्यांचे पद जरी राजकीय असले तरी दोघेही राजकारणी नाहीत. उध्दव ठाकरे तर निरागस मनाचे असून त्यांच्या अंतरात्म्याला स्मरूनच त्यांनी पाथरीच्या साईच्या जन्मस्थानाला मदत करण्याचे औदार्य दाखवले. पण आता शिर्डीकरांचे साईच्या जन्मस्थानालाच आव्हान देणे सुरू आहे. असे म्हणतात की, संताचे कुळ आणि नदीचे मूळ कोणी काढू नये. हा श्रध्देचा भाग असतो. मुख्यमंत्र्याच्या मनात तर मराठवाडा-नगर असा वाद नाहीच. पण हा विषय नको तितका ताणणे सुरू आहे.

            तब्बल एक कोटी अभंग लिहिणारे संत नामदेव यांच्या हिंगोलीतील नरसीबामणीला अर्थसहाय्य केले म्हणून पंजाबमध्ये कडकडीत बंद पाळणे जितके हास्यास्पद, तितकेच हे प्रकरण आहे. ज्ञानेश्वराच्या आपेगावला मदत केली नाही म्हणून आळंदीचा पुणे एमआयटीने सुरू केलेला जिर्णोध्दार थांबला नाही. साई जन्मस्थानावरून शिर्डीच्या मंडळींनी सुरू केलेला नादानपणा कोणीतरी प्रगल्भपणे थांबविण्याची गरज आहेशिर्डीच्या महात्म्याला तो शोभा देणारा नाही.

            वस्तुत: साईचा जन्म शिर्डीचा नाही, हे तर सत्य आहे. कोणत्याही साईसच्चरित्रामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील धुपखेडा येथे चांद पटेल यांची या अवतार पुरूषाशी भेट झाली. त्यांची घोडी कुठे अडली आहे, हे त्यांनी नेमकेपणाने सांगितले. पुढे त्यांच्याच मुलीच्या -हाडाबरोबर साई शिर्डीला आले अन् पुढे शिर्डी हीच त्यांची कर्मभुमी झाली. अगोदर या फकीराची कोणी दखल घेतली नाही. तथापि, औरंगाबादच्या गोदावरी नदीमध्ये असलेल्या राला बेटाचे संस्थापक मठाधिपती योगिराज गंगागिरी महाराज यांनी सार्इंना शिर्डीत पाहिले आणि त्यांची चैतन्यमय मुद्रा पाहून सांगितले की शिर्डीचे हे मोठे भाग्य आहे म्हणून हे अमोल रत्न याठिकाणी राहत आहे. त्यावेळी गंगागिरी महाराज साठीत होते तर साईबाबा अवघ्या सोळा वर्षांचे. पुढे काही दिवसातच त्यांच्या शब्दाची प्रचिती शिर्डीकरांना आली. साईभक्त विश्वास खेर यांनी साईच्या जन्मस्थानावर पंचवीस वर्षे संशोधन केले आणि प्रथमत: १९७८ ला पाथरी हे जन्मस्थान असल्याचा निर्वाळा दिला. नंतर उत्खन्नात त्याचा दाखला देणा-या वस्तु सापडल्या. एवढे कशाला १९९४ मधील हिंदी साहित्य चरित्रात साईबाबाचा जन्म पाथरीत झाला असल्याचा उल्लेख आहे. तसे कंदर २९ पौराणिक पुरावे जन्मस्थानाच्या पुष्ट्यर्थ मांडण्यात येत आहे.

            मराठवाडा ही संतांची भुमी आहे. औरंगाबाद ही तर पर्यटनाची राजधानी. पण ना पर्यटनस्थळ विकसित झाले ना कोणते तिर्थक्षेत्र. साध्या जगप्रसिध्द अजिंठ्याकडे जाणारा रस्ता व्यवस्थित नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच स्थानिक नेते कंत्राटदारांना कसे पळवून लावतात, याची रंजक कहाणी सांगितली.

            सध्याच्या पुढा-यांची अशी महती असली तरी मराठवाड्याची संत परंपरा ही खरोखरच तेजस्वी आहे. बाराव्या शतकापासून चारशे वर्षांमध्ये या भागात पासष्ट मोठे संत होवून गेले. संत ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडं मुळचे पैठणच्या आपेगावचे. नामदेव महाराजांचे जन्मस्थान नरसीबामणी अन् त्यांचे गुरू विसोबा खेचर हेही त्याच भागातले. तुकारामांच्या महत्त्वाच्या शिष्या बहिणाबाई वैजापूरमधील शिवूरच्या. तुकाराम परंपरेतीलच एक संत तुका विप्र हे मूळचे बीडचे. संत एकनाथ पैठणचे. त्यांनी एकनाथी भागवत लिहले. त्यांचे गुरू जनार्दनस्वामी हे दौलताबादचे. तर सुफी संत चांद बोधलेंना जनार्दनस्वामींनी गुरू मानले होते. सातवाहन, शालीवाहन घराण्याचा विकास पैठणला झालापैठणचे कवी गुणाढ्य यांनी संस्कृतऐवजी प्राकृत भाषेत बृहतकथाकोष लिहिला. हालाहाल हा पैठणचा राजा. पण तो कवी होता. त्यांनी गाथासप्तशती लिहिली. महानुभव पंथांचे संस्थापक चक्रधरस्वामी यांचे पैठण आणि वेरूळला दीर्घकाळ वास्तव्य होते. पैठण तर महानुभव पंथाचे महास्थान. स्वामीचे शिष्य भास्करभट्ट बोरीकर हे परभणीच्या बोरीचे. मराठी साहित्यात महादंबेचे ढवळे प्रसिध्द आहेत. ही महादंबा बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील पूरीपांढरी गावची. संत जनाबाई गंगाखेडच्या. केवळ पुरूषच नव्हे तर स्त्री संत परंपरा या विभागाला लाभलेली असून त्याच्यावर डॉ. सुहासिनी इर्लेकर यांनी शोधप्रबंध लिहिला आहे. दासबोधकार संत रामदास जांबसमर्थ या परतूरजवळच्या गावाचे आणि रामदासांचे शिष्य कल्याणस्वामी परांड्याचे. पासोडी, गीतार्णव ग्रंथ लिहिणारे मराठीचे आद्यकवी दासोपंत आंबेजोगाईचे. संत गोरोबा काका उस्मानाबादमधील तेरचे. बसवेश्वरांच्या अनेक वीरशैव संतांनी परळी, लातुर, उदगीर, औसा याठिकाणी मराठीत रचना केल्या. वारकरी आणि मुस्लिम परंपरेतून एकात्म झालेला सुफी पंथ देखील याच भागात वाढला. त्यांचे शेख मोहम्मद हे मूळचे किल्लेधारूरचे. मुस्लिम आक्रमणानंतर हिंदी खडीबोली या भागात रूजली. हिंदीमध्ये काव्य करणारे निपट निरंजन यांची विद्यापीठाच्या मागे समाधी आहे. इंटरनेट आणि गुगल नसलेल्या काळात या संतांनी केलेले काम केवळ अद्भूत आहे.

            त्यामुळेच पैठणला संतपीठ झाले पाहिजे, अशी मागणी मराठवाड्यातील मंडळी शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असल्यापासून करीत आहेत. संतपीठाची घोषणा झाली, पण प्रत्यक्षात काही घडले नाही. सध्याच्या विस्कोट झालेल्या आर्थिक आणि मानसिक स्थितीमध्ये अध्यात्माचे ज्ञान देणारे भक्तीपीठ मराठवाड्यात होणे गरजेचे आहे. जर्मनीमधील हेडलबर्ग येथे अशा प्रकारचे भक्तीपीठ आहे. संत साहित्याचे अभ्यासक डॉ.यु..पठाण यांचे वय ८५ च्या वर गेले असले तरी ही मागणी ते आजही लावून धरीत आहेत.

            या पाश्र्वभूमीवर साईबाबांचा पाथरीचा जन्म हा मराठवाड्यासाठी मानाचा तुरा आहे. खरेतर अनेक शतकाच्या धार्मिक घुसळणीचे शिखर साईबाबांनी गाठले. शैव, वैष्णव पंथ, हिंदु-मुस्लिम-जैन-बौध्द यांच्या तत्वज्ञानाची गुंफण करून साईबाबांनी सबका मालिक एक है, अल्लाह मालिक है, श्रध्दा-सबुरी, याला एका सूत्रात मांडले. सर्व धर्मांना जोडणारा मानवधर्म साईबाबांनी आपल्या आचरणातून सिध्द केला. आता त्यांच्या जन्मस्थानावरून चाललेला वाद हा अनाठाई आहे. आजही तेलंगणा आणि आंध्रप्रदेशमधील अनेक बसगाड्या कुठलेही निमंत्रण देता पाथरीला येतात. एवढेच नव्हे तर साईबाबांच्या बोलण्यात सातत्याने सेलू, जालना, पाथरी, परभणी आणि औरंगाबादचा उल्लेख आहे. औरंगाबादचा उल्लेख त्यांनी नौरंगाबाद असा केला आहे. औरंगाबाद की संभाजीनगर या वादात कधी सार्इंचा शब्द म्हणून नौरंगाबाद झाले, तरी हरकत नाही.

            साईबाबाचे जन्मस्थान विकसित झाल्याने शिर्डीचे महत्त्व कमी कधीच होणार नाही. उलट या जन्मस्थानाचा विकास करण्याची जबाबदारी मोठ्या मनाने साई संस्थानाने घेतली पाहिजे. महापुरूषांना कोणत्याही स्थानाच्या, देशाच्या आणि गावाच्या सीमा नसतात. ही सीमांची तटबंदी आपणच घातली आहे. शिर्डीला विमानतळ झाल्यानंतर आणि दक्षिण भारतातील अठरा रेल्वे शिर्डीला थांबल्यानंतर शिर्डी हे परिपूर्ण पर्यटन तिर्थक्षेत्र झाले. औरंगाबादकरांचे त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले. पण म्हणून औरंगाबादकरांनी कडकडीत बंद पाळला नाही की शिर्डीचा निषेध केला. शेवटी शिर्डीची महिमा वाढविण्यामध्ये देशातील भक्तगणांनी जो पुढाकार घेतला, त्याला तोड नाही.

            मराठवाड्यातील संत एकनाथ वगळता अनेक महत्त्वपूर्ण संतांनी त्यांची कर्मभूमी मराठवाड्याच्या बाहेर निवडली. संत नामदेवांच्या रचना तर गुरूग्रंथसाहिबमध्ये समाविष्ट झाल्या. पण त्यांची नाळ ही मराठवाड्याशी जोडली गेलेली आहे. पण या विभागाने कधीही त्याचा बडेजाव केला नाही. मराठवाड्याचे पाणी अडवले म्हणून तक्रार केली नाही. आता हा जन्मस्थानाचा वाद शासनाला शमविणे आवश्यक आहे. शिर्डीचा विकास होवो. आंतरराष्ट्रीय विमानतळ मोठे होवो. मानवतेचा साईधर्म वाढो. हीच मराठवाड्याची भावना. पण त्याबरोबर या महापुरूषाच्या जन्मस्थानाची किमान ओळख निर्माण झाली तर फारसे काही बिघडणार नाही. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाच या वादावर पडदा टाकावा लागेल. श्रध्दा आणि सबुरी ठेवली तर साई जन्मस्थानाचा वाद हे पेल्यातील वादळ ठरेल, असे वाटते.