अगा जे पाहिले नाही कटकारस्थानाचं तोरण

- संजीव उन्हाळे

शुक्रवारी मध्यरात्रीपासून सत्तांतराच्या पोरखेळाचा पुरता खेळखंडोबा झाला. याला पेल्यातील वादळ म्हणावे की सुडाचे राजकारण. सत्तेचा पेचप्रसंग आणखीन आठ दिवस कोणकोणते रंग दाखविणार आहे कुणास ठाऊक. पोट भरलेल्या मंडळींना एका मालिकेसारखी ही करमणूक झाली. पण, अतिवृष्टीने हैराण असलेल्या बळीराजाने हा खेळ कशासाठी पहावा. जाणता राजाला दिल्लीतील चाणक्याने चेक दिला खरा पण, अखेरचा चेकमेट देवून कशी बाजी पलटावली जाईल, तेही बघणे आपल्याला भाग आहे.

                इकडे शेतकरी कामकरी अतिवृष्टीने होरपळलेला, दररोजच्या घरखर्चाची मोठी भ्रांत अन् राजकारणी मात्र निवांत. २४ ऑक्टोबरपासून महिनाभरात संशयकल्लोळ, कट्यार काळजात घुसली, मानापमान, असे वेगवेगळे प्रयोग झाले. शनिवारी तर विपरीतच घडले. सुर्योदयापासून ते रात्री उशिरापर्यंत सत्तासुंदरीला वश करण्याचे प्रयत्न झाले. मध्यरात्रीनंतर मुख्यमंत्रीपदाचा खेळ मांडियेला गेला अन् सकाळी राजभवनात अनपेक्षितपणे भाजपचे देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी सोहळा साध्या पध्दतीने पार पडला. अख्ख्या महाराष्ट्राला हा गोड बातमीचा गजब धक्का होता. आजची वर्तमानपत्रं उद्याची रद्दी असते. पण, शनिवारी मात्र सकाळीच वर्तमानपत्रांची रद्दी झाली. मी पुन्हा येईन म्हणणारे फडणवीस खरोखरीच दुस-यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना पाहून याची देही याची डोळा अनेकांना त्याची प्रचिती आली. या गोड बातमीला पाठीत खंजीर खुपसल्याची किनार होती. शेतक-यांचा सदैव कैवारी अन् जाणता राजा म्हणून ओळख असलेल्या साहेबांच्या पाठीत घरच्यानीच खंजीर खुपसला अन् यु टु ब्रुट्स, असं जाणता राजा पुतण्याला बघून कळवळून म्हणाला असेल. ’’झोपेत घातला दगड, अन् तू आमचा होतास, रात्री नजर होती लाचार अन् मुठीत लपवला खंजीर. आणि वाटले सकाळी आता सगळेच दगाबाज झाले आहेत. पण म्हणतात ना, सुबह का भुला शाम को लौटा तो उसे भुला नही कहते. बारापैकी अजितदादा वगळता सगळे आले परत. एकाला तर हॉटेलमधून ओढून आणले सेनानेत्यांनी. आता एक आमदार हरवल्याची फिर्याद पोलीसात. तरीही अजुन आठ दिवस जायचे आहेत आणि या आठ दिवसात किती चुका घडायच्या आणि किती पोटात घातल्या जायच्या आहेत कुणास ठाऊक. ज्यांच्यावर होती मदार, तेच निघाले गद्दार. काँग्रेस-शिवसेनेने सुरक्षित ठेवले आमदार, पण मुरब्बी जाणता राजाच राहिला गाफील. गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री, धडा शिकवल्याशिवाय आता उपाय नाही, अशी जाणत्या राजाची काहीशी घालमेल महिनाभराची जुळवाजुळव केल्यानंतर पहायला मिळाली. दिव्याखालचा अंधार कुणाच्या नजरेत आलाच नाही. मराठवाड्याचे प्रसिध्द कवी आणि राजकीय उपहासकार विलास वैद्य यांनी एका कवितेत म्हटले आहे - ’’या गटातून त्या गटात, हस्तांतरीत करीत आहेत, ते ध्वज फडफडता... तुटता तुटता जुळवून घेऊन, एकसंघ दाखवत आहेत, टापांचे आवाज... झिरपून खोल आत.. कुठले उभारून आले आहे, हे तत्वज्ञान... संकटात अडकवलीत त्यांनी, महापुरूषांची स्मारवंâ, समरगीत आणि राष्ट्रगान, पाणउतारा झाल्यागत शौर्यभूमी, पुन्हा पुन्हा सहन करीत आहे आघात, हे खोटे वादळ वारे...? हे खोटे झंझावात...?’’ या कवितेप्रमाणे सगळा बिनपैशाचा तमाशा शनिवारी पहायला मिळाला. काका-पुतण्याच्या लढाईचा या भुमीला आहे शाप. एकेकाच्या एकेक कथा. कुणी तपासल्यात त्यांच्या व्यथा. आधीच तपासून पहा कोण काका अन् कोण पुतण्या. नाही तर होईल उद्या ताप. २००५ चे बाळासाहेब ठाकरे अन् राज ठाकरे या काका-पुतण्यांचा बेबनाव असो की गोपीनाथ मुंडे - धनंजय मुंडेंचा २०११-१२ चा काडीमोड, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर यांच्यात २०१५ ला निर्माण झालेली दरी इथपासून बदामराव पंडित - अमरसिंग पंडित अशी कितीतरी काका-पुतण्यांच्या लढाया. पण, जाणता राजा काका म्हणून सुध्दा आहे बहाद्दर, त्यात टाकली अजितदादाने नवी भर. काकांच्या नकळत जमवले आपले दळ आणि मांडला गेला नवीन  खेळ. कधी वाटायचे बंड यश देवून जाईल, कुणी म्हणे हे तर दिवसभरातील पेल्यातील वादळ. तसे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे यांच्यातील बंड असेच पेल्यातील वादळ ठरले होते. हा नेता संकटात सापडला की, चवताळून उठतो, पूर्ण ताकदीनिशी लढतो, आणि हवा तसा डाव मांडून घेतो. मग अशावेळी तरूणांना आधार देतो, नवनेतृत्व उदयाला आणतो. पण, चुकीच्या माणसाच्या हातात महाराष्ट्र जावू नये, याची तेवढ्याच आत्मियतेने काळजीही वाहतो. त्यासाठी पायाला भिंगरी लावून फिरतो. ते काहीही असो. जे याआधी कधी पाहिलं नव्हतं, ते शनिवारी दिवसभरात प्रत्यक्षात त्यांना स्वत:लाही अनुभवायला मिळालं. परस्परातील वैर वाढवत, एकोप्याचे प्रयत्न करणे, याआधी कधी पाहिलं नव्हतं... दुराव्याचे पूल उभारून, एकमेकाला भेटायला जाणं, याआधी कधी अनुभवलं नव्हतं... कटकारस्थानाचं तोरण बांधून, विकास आघाडीत सामील होणं, असं कधी पाहिलं नव्हतं... याच नाट्याचे नवनवे प्रवेश आता आठवडाभर महाराष्ट्राला पहायला मिळणार आहेत.

                अजितदादा नावाचेच दादा. पण, प्रत्यक्षात भलताच भाऊक माणूस. लहान मुलासारखे रुसून बसणे, चंचलपणात काहीतरी हट्ट करणे, असे अनेक अनुभव महाराष्ट्राने घेतले आहेत. राजीनामा देणे तर त्यांचे प्रिय हत्यार आहे. हे हत्यार अनेकदा ते खेळणे म्हणूनच वापरतात. आपणच फक्त वारस अन् बाकी सगळे अनौरस, असा त्यांचा समज. छगन भुजबळांना उपमुख्यमंत्री केले तेव्हा दादांनी आमदारांच्या सह्यांचे पत्रच पेश केले. आताही त्यांचा राग काँग्रेसवर अन् मोर्चा वळवला राजभवनावर. महिनाभरापासून ते एकच सांगत आहेत की, काँग्रेसवाले खेळ करतात, वेळ घालवतात, साहेबांचा अपमान करतात, कमी जागा असून अपेक्षा जास्त अन् जास्त जागा असून आपली मुख्यमंत्रीपदापासून उपेक्षा. पण, शेवटी आघाडीचे राजकारण अन् साहेबांची दूरदृष्टी ना कधी त्यांना समजली, ना उमजली. साहेब देशाचे राजकारण बदलायला निघालेले अन् त्यांच्या पायात बांधलेल्या कौटुंबिक कलहाच्या बेड्या, तर जमणार कसे? त्या ईडीला येडी करून टाकू, असं साहेब म्हणाले असताना कशासाठी झिजवले भाजपचे उंबरठे, असा प्रश्न लोक विचारू लागले. शेवटी साहेबांनी भाजपबरोबर कधीच जाणार नाही, हे निक्षून सांगितले आहे. हकालपट्टीपर्यंत वेळ आली. आता ठरणार आहे निष्ठाश्रेष्ठ की थैलीश्रेष्ठ. तशी बावीस मंत्रीपदाची अन् २५ महामंडळाच्या अध्यक्षपदाची पदे कोणासही देवू, पण शिवसेनेला नमवू, असा भाजपचा पण आहे. तर इकडे साहेबांच्या राजकीय कौशल्याची सत्वपरीक्षा आहे!

                तिकडे भाजपही काही कच्चा खेळाडू नाही. इकडे जाणता राजा आहे तर तिकडे चाणक्य. या चाणक्याने अनेक राज्यातील बेदिली सहजपणे ’खिशात’ घातली. सगळ्यांचे खेळ झाल्यानंतर आता आठ दिवसांची कसोटी हे चाणक्य खेळणार आहे. दिल्लीचा हा चाणक्य कधीही हरला नाही. पण, इतर राज्यासारखा महाराष्ट्र नाही. आता या अश्वमेधाचा घोडा महाराष्ट्रात अडवला जातो की अश्वमेध जिगिषूपणाने पुढे जातो, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.