आयबी ईडी, भाजपात दुसरी पिढी, संकटात ‘घडी’
- संजीव उन्हाळे
पश्चिम महाराष्ट्रातून
अनेक पाटील, राजे, महाराजे भाजपच्या
आश्रयाला गेले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना त्यांच्या
नातलगांच्या भाजप प्रवेशाबद्दल विचारले असताना ते जाम वैतागले. पद्मसिंह पाटील व
त्यांचे सुपूत्र राणाजगजितसिंह पाटील यांचा कथित भाजप प्रवेश हा कुठीराघात ठरला.
आयुष्यभर सावलीप्रमाणे साथ देणारा मित्र दुस-या पक्षात
गेल्याची ती वेदना होती. भाजपने ईडी, सीबीआय, अॅण्टी करप्शन, इन्कम टॅक्स ही
सर्व आयुधे वापरून अनेकांना आश्रित बनविले. अर्थात, तिस-या पिढीचा अभाव, नातलगांचा कळवळा
अन् निर्माण केलेले बेहिशेबी साम्राज्य यामुळे हा पक्ष अडचणीत सापडला.
रयत शिक्षण संस्थेच्या
एका कार्यक्रमामध्ये शरद पवार यांना एका पत्रकाराने आपले जवळचे नातलग डॉ. पद्मसिंह
पाटील राष्ट्रवादीत आहेत काय, असा प्रश्न विचारताच ते भडकले. या एकाच प्रश्नाने ते
उद्विग्न झाले. खरे तर शरद पवार हे व्यक्तित्त्व हतबल होणा-यातले नाही.
चारही बाजूंनी घेरले गेले असतानाही त्यांनी आपला संयम ढळू दिला नव्हता. वस्तुत:
२०१४ च्या भाजपच्या सरकारचा विश्वासदर्शक ठराव सभागृहामध्ये राष्ट्रवादीच्या
पाठिंब्यावरच झाला होता. पहिल्या पाच वर्षांमध्ये ‘पवार माझे गुरू, त्यांचे बोट
धरूनच मी राजकारण शिकलो’ अशा प्रकारे त्यांना वश करण्याचे बरेच प्रयोग झाले. पण
शरद पवार त्याला बधले नाहीत. उलट देशभरातील विरोधी पक्षांना एकत्र करून आघाडी करण्याची
भाषा ते करत असत आणि असा जुगाड ते सहज जमवू शकले असते. या कारणांमुळे पवारांचे
राजकारण केंद्रीय नेत्याच्या नजरेत सलत असावे. कदाचित त्यामुळेच
त्यांचा गढ उद्ध्वस्त केला गेला असावा.
पश्चिम महाराष्ट्रातील
अनेक घराणी, पाटील, राजे, महाराजे भाजपच्या
आश्रयाला गेले ते उगीच नव्हे. मुळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची वाढ ही संस्थात्मक
आहे. सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था, शिक्षणसम्राट, साखरसम्राट, बिल्डर यांची
अनेक संस्थाने उभी राहिली. ती राष्ट्रवादीची मतपेढी व निवडणुकीतला फौजफाटा होता
असे हे गणित होते. शतप्रतिशत काँग्रेसमुक्त भारत तर जमले नाही पण भाजपा सरकारने
ईडी, सीबीआय, अॅण्टी करप्शन
ब्युरो, इन्कम टॅक्स, चौकशा, अशा आयुधांचा
सर्रास वापर केला. परिस्थिती अशी निर्माण केली की ही सर्व मंडळी भाजपच्या आश्रयाला
यावी. पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर जागोजागी राष्ट्रवादी पक्षद्रोहाचे सुरूंग
लावण्यात आले. विजयसिंह मोहितेपाटील, रामराजे निंबाळकर, धनंजय महाडीक, शिवेंद्र
राजेभोसले आदी सर्व मंडळी भाजपच्या छत्राखाली दाखल झाली आहेत. ‘भारतीय’ जनता पक्ष
जणू ‘भरती’ जनता पक्ष झाला आहे. त्याला ते अभिमानाने मेगा भरती म्हणतात.
मराठवाड्यातून बीडचे जयदत्तअण्णा क्षीरसागर शिवसेनेत गेले. राष्ट्रवादीच्या काही
तरुणतुर्क नेत्यांनी त्यांच्या घरात जसे घरभेदी राजकारण चालू आहे तसेच
क्षीरसागर घराण्यातही सुरू केले. संदीप क्षीरसागर या जयदत्तअण्णांच्या पुतण्याला
राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच बळ देण्यात आले. या सगळ्या प्रकाराने उद्विग्न होऊन
जयदत्तअण्णा शांतपणे शिवसेनेत गेले अन कॅबिनेट दर्जाचे
रोजगार हमी योजनेचे मंत्रीही झाले. याशिवाय राष्ट्रवादीची कोठेही फंदफितुरी झाली नाही. तथापि, सौ सुनारकी और एक लोहारकी असा कुठीराघात भाजपने
उस्मानाबादेत केला. उस्मानाबादेत भाजपला गेल्या अनेक वर्षांपासून जनाधार नाही.
त्यांचा एकही आमदार नाही. या सर्व गोष्टी हेरून आमदार राणाजगजितसिंह यांचा भाजप
प्रवेश आता होत आहे.
शरद पवार हे डॉ. पद्मसिंह
पाटील यांचे व्याही आणि राणाजगजितसिंह अजित पवारांचे भाचे. जवळपास ५० वर्षांच्या
राजकारणात डॉ. पद्मसिंह पाटील यांनी शरद पवारांना सावलीसारखी साथ दिली. पवारांनी
सांगायचे आणि ती मोहीम पद्मसिंहांनी फत्ते करायची. अर्थात, डॉ.पद्मसिंह हा
रांगड़ा, मोकळाढाकळा
माणूस. त्यांनी साखर कारखाना, मेडीकल कॉलेज, इंजिनिअरींग कॉलेज असे साम्राज्य उभे केले.
राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांच्या तुलनेत हे साम्राज्य छोटेच. पण बिनधास्त
वृत्तीमुळे ते चौकशीच्या फे-यात अडकले. तेरणा सहकारी
साखर कारखान्याला १२९ कोटी रुपयांचे कर्ज सहकारी बँकांकडून घेतले. त्याची थकीत
रक्कम २९२ कोटी रुपये इतकी झाली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून हे थकीत कर्ज
पाटील यांनी भरलेले नाही. आता ही आयती संधी भाजपला चालून आली. राणाजगजितसिंह यांची
तर इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती झाली. शेवटी भाजपमध्ये जाण्याचा त्यांनी निर्णय
घेतला. सत्तेच्या सारीपाटावर आणखीन एक घटना घडली. या घराण्याशी वैमनस्य असलेले
ओमराजे निंबाळकर खासदार झाले.
देशातील काळा पैसा
प्रतिबंध विरोधी कायदा, आर्थिक गैरव्यवहार, करप्रणाली, पेâरा कायद्याचे
उल्लंघन या संदर्भात सक्त वसुली संचालनालय चौकशांचे काम करते. शिक्षण संस्था, साखर कारखाने, त्यातल्या त्यात
वैद्यकीय महाविद्यालये, पैसे कमविण्याचे मोठे साधन राष्ट्रवादीच्या मंडळींनी उभे
केले. आता हीच साधने त्यांच्या गळ्याचे फास बनली. राज्यामध्ये कामगारमंत्री संभाजी
निलंगेकर यांच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या थकीत कर्ज प्रकरणात सीबीआय आर्थिक गुन्हे
शाखेने एफआयआर नोंदविला आहे. मनसेतून भाजपमध्ये दाखल झालेले आमदार प्रवीण दरेकर, मुंबई जिल्हा
सहकारी बँकेत गैरव्यवहारात दोषी आहेत. विजयकुमार गावित यांचा आदिवासी खात्यातील
गैरव्यवहार चांगलाच गाजला. या सर्वांचे चौकशी अहवाल आले आणि दोषीही आढळले.
सत्तेच्या वळचणीला गेल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही. सक्त वसुली संचालनालय
काळा पैसा प्रतिबंध विरोधी २०१३ कायद्यातील सुधार प्रमाणे कलम-४५ नुसार एखाद्या
आरोपीकडे सबळ पुरावे असले तरीही आरोपीला तात्काळ जामीन मिळत नाही. चौकशी यंत्रणा
आरोपीची चौकशीची करायची आहे यासाठी दोन-तीन वर्षे आरोपींना कस्टडीत ठेवता येते.
छगन भुजबळ प्रकरणाने ते सिद्धही झाले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे अजित पवार
यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक नेते कायद्याच्या कचाट्यात सापडले. लक्षणीय बाब
म्हणजे भाजपकडे आश्रयाला गेलेल्या नेत्यांमध्ये काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचा मोठा
भराणा आहे. मराठवाड्यातून काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार तेवढे भाजपच्या
महाजनादेश यात्रेत ते मुख्यमंत्र्यांच्या बरोबर रथावर आरूढ झाले. कदाचित त्यांनाही
शुद्ध करून घेतले जाईल. शुद्धीकरणाचा अफलातून फॉम्र्युला केंद्रीय राज्यमंत्री
रावसाहेब दानवे यांच्याकडे आहे. एका जाहीर भाषणात त्यांना निरमा वॉशिंग पावडरची
आठवण झाली. ही जाहिरातच सध्या भाजपची टॅगलाईन आहे. रावसाहेब म्हणतात की अशा
कोणत्याही नेत्यांना आम्ही गुजरातच्या वॉशिंग पावडरमध्ये स्वच्छ धुवून घेतो.
अहमदाबाद स्थित निरमा वॉशिंग पावडरचे काय ते वर्णावे महात्म्य!
राष्ट्रवादी काँग्रेसची
जी पिछेहाट झाली ती केवळ भाकरी फिरवली नाही म्हणून. फळ कडवट लागले की फेकून द्यायचे असते हे
राष्ट्रवादीच्या नेत्यांना कधीच कळले नाही. पक्षात आपले स्पर्धक तयार होतील या
भीतीने राष्ट्रवादीतील दुस-या पिढीने तिसरी पिढीच तयार होऊ दिली नाही. महत्त्वाची बाब
म्हणजे आपली पोरंसोरं म्हणजेच तिसरी पिढी एवढाच सोईस्कर अर्थ अनेक नेत्यांनी
काढला. आता ही दुसरी पिढीच भाजपमय झाल्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पार्थ
पवार याच्या उमेदवारीला शरद पवारांचा प्रारंभी विरोध होता. शेवटी कौटुंबिक
कारणांमुळे कदाचित त्यांना हार मानावी लागली. खरं तर पार्थ पवार आणि रोहीत पवार
यांचे प्रस्थ वाढविण्याची गरज नाही हे शरद पवारांच्या लक्षात येते ते इतर
नेत्यांच्या का येऊ नये. अर्थात, या सर्व प्रकारांमुळे महाराष्ट्राचा जाणता राजा असलेल्या
शरद पवारांना ८० व्या वर्षामध्ये ‘हेचि फळ काय मम तपाला’ म्हणण्याची वेळ येत आहे.