निसर्गाची गोंधळ माऊली, जनता संकटांनी कावली

 - संजीव उन्हाळे

 

ऑगस्ट संपत आला तरी मराठवाड्यात पाऊस नाही. कृत्रिम पावसाचा प्रयोगही सपशेल फसला आहे. रडारवर कोठेही ढग दिसत नाहीत. मराठवाड्याचे हवामानतज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांच्या मते परतीच्या पावसाची शक्यता तर नाहीच पण पुढील दोन वर्षे पाऊस यथातथाच राहील. काही हवामानतज्ज्ञांनी तर खरीपाचे पीक घेऊच नये असा टोकाचा सल्ला दिला आहे. त्यात आयपीसीसीने सादर केलेल्या अहवालामध्ये हवामान बदलाचा सर्वाधिक परिणाम जमिनीच्या नापिकीवर होतो असे स्पष्ट केले आहे. मराठवाड्यातील तोच अनुभव आहे.

हे निसर्गदेवते, तुझी लिला खरोखरीच अगाध असते. या पामर मानवाला तिचा अनेकदा अनुभव आला आहे. तिकडे सातारा-सांगली-कोल्हापूरमध्ये महापुराने प्रचंड थैमान मांडले आहे. इकडे मराठवाड्यात कसाबसा रिमझिम पाऊस झालेला. त्यामुळे जमिनीचा तळवाही भिजत नाही. पाऊस नसल्याने संपूर्ण मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट पसरलेले आहे. माणिक वर्मांनी गायलेलं गाणं ‘तूज सगुण म्हणू की निर्गुण रे’, सगुण-निर्गुण दोन्ही विलक्षण. निसर्गदेवते, अगदी अशाच विलक्षण अनुभवातून महाराष्ट्र जात आहे. एवढे कशाला कृत्रिम पावसाचा खेळ आम्ही मांडियला होता. पुरेसा पाऊस झाला नाही की असे काहीबाही आम्हाला आठवते. त्यातलाच हा एक खेळ. रडार बसविले, विमान आले, ये रे ये रे पावसा, तुला देतो तीस कोटीचा पैसा असं म्हणू लागलो तोपर्यंत आभाळातून पावसाचे ढगच गायब! संपूर्ण मराठवाडा, तेलंगणा अन् कर्नाटकातले बिदर, गुलबर्गा, रायचूर असे तीन जिल्हे याप्रमाणे जुन्या हैदराबाद संस्थानाचा हा भाग हवामान बदलाच्या तडाख्यात सापडला. अशीच परिस्थिती २०१० पासून आहे. या विषयाचे गाढेअभ्यासक लातूरचे अतुल देऊळगावकर म्हणतात- सध्या महाराष्ट्रात हवामान बदलाने निव्वळ ‘केऑस’ म्हणजेच गोंधळ माजविला आहे. माऊली, तुझ्या समोरचा भक्तांचा गोंधळ माहिती आहे. पण आता तू ही! इतका प्रकोप केला की आता अभ्यासकच गोंधळमाऊली म्हणू लागले आहेत. तिकडे महापुरात अनेकांचे बळी गेले. इथे लक्षावधी माणसे जिवंतपणी मरणयातना भोगत आहेत. आत्महत्या करीत आहेत. काही शास्त्रज्ञ शहाजोगपणे म्हणतात की आता मराठवाड्याने खरीपाचा विचारच करू नये. करायचाच असेल तर रबीचा करावा. इक्रीसॅटने २०१२ मध्ये असाच इशारा दिला होता. औरंगाबादच्या एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले की मराठवाड्यात आता परतीचा पाऊस होण्याची शक्यता फारच कमी आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे उत्तर भारतातून वेळेच्या जवळपास एक पंधरवाडा अगोदर परतीचा पाऊस येऊन गेला आहे. मराठवाड्यामध्ये आणखीन दोन वर्षे पावसाची परिस्थिती अशीच राहील असे विविध आराखड्याच्या आधारे त्यांनी स्पष्ट केले. मात्र कोकणच्या पश्चिम किनारपट्टीवर जोरदार पाऊस पडणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा सगळा प्रकार तापमानवाढीमुळे नव्हे तर तापमानातील घसरणीमुळे झाला आहे. सध्या २० ते २१ डिग्री सेंटीग्रेट तापमानापेक्षा हे तापमान अडीच टक्क्यांनी खाली घसरले आहे. पश्चिम बंगालमधून येणारा मराठवाड्याचा पाऊस आलाच नाही. उलट हिंद महासागरातील तापमान ०.४ डिग्री सेंटीग्रेटवरून १.२ डिग्री सेंटीग्रेटवर गेलेले आहे. ही परिस्थिती कठीण असली तरी वस्तुस्थिती आहे, असे डॉ. औंधकर म्हणाले. ऑस्ट्रेलियाच्या एका ज्येष्ठ हवामानतज्ज्ञाने अशी गोंधळाची उलटसुलट स्थिती निर्माण होईल असे भाकीत केले होते. पण हे सगळे झाकून ठेवण्यात आले. लोकशाहीमध्ये एक नियम आहे की हवामानाचा खरा अंदाज सांगायचा नसतो. तसे केले तर राजकीय हवामानावर परिणाम होतो. सध्या यात्रा चालू आहे, प्रत्येकजण आपापल्या परीने निवडणूक प्रचारात मश्गुल आहे. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश ही संवादयात्रा सध्या मराठवाड्यातून जात आहे. महापूर तर त्यांनी अनुभवला आता दुष्काळी परिस्थितीचे दर्शन घडेल. पण हे देवते, ‘यावेळी यात्रेत निसर्गयुक्त संवाद घडोत, जलयुक्त ढग येवोत आणि किमान कृत्रिम पावसाचे तरी चार थेंब पडोत. आता नुसता संवाद नको, पाऊस हवा.’ आमच्याकडचे जायकवाडीचे पाणी पहा, अन् पानपुâल वहा. कशाला शेतीभाती, पिण्याला पाणी मिळाले तरी शहरी जीव सुखावला जातो. पण खेड्यातल्या जनतेचे दु:ख कुठे मांडायचे?

माऊली, या आठवड्यात इंटर-गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजने (आयपीसीसी) हवामान बदलामुळे शेतजमिनीवर कसे विपरीत परिणाम होतात हे सांगताना भारताच्या एवंâदर भूभागापैकी ३० टक्के भूभागाचा -हास होणार आहे. तेवढी जमीन नापीक होणार आहे, हे स्पष्टपणे नमूद केले आहे. आता आमची उपजीविकाच शेतीवर आहे. शेती आणि पशुपालनामुळे मिथेन आणि नायट्रस ऑक्साईड हवेत सोडले जातात. हे दोन वायू कार्बनडायऑक्साईडपेक्षा शंभरपटीने हानीकारक ठरतात. झाडझाडोरा, जमीन, जंगले, नेहमीच कार्बनडायऑक्साईड मोठया प्रमाणात शोषून घेतात. समुद्र आणि जमिनीद्वारे हवेतला कार्बनडायऑक्साईड ५० टक्के शोषला जातो. आणि उरलेला कार्बनडायऑक्साईड वातावरणातच राहतो. हे कार्बनचक्र अविरत चालू आहे. समुद्राने, जमिनीने कार्बन शोषून ठेवला आणि तो किती काळासाठी शोषून ठेवला याच्यावर संशोधन झालेले नसले तरी गाई-म्हशी आणि कुक्कुटपालन यामुळे मिथेन गॅसची निर्मिती होते ही गोष्ट खरी आहे. भारताने अनेक जागतिक परिषदात वृक्ष लागवड आणि जंगल निर्मितीसाठी आयपीसीसीला भलीथोरली आश्वासने दिली आहेत. म्हणूनच आपल्याकडे ५० लाख वृक्ष लागवडीपासून लक्षलक्ष वृक्षलागवडीचे बेत आखण्यात येतात. अर्थात, प्रत्यक्षात वृक्षारोपण किती होते हे आपणास माहिती आहे. २०३२ पर्यंत झाडे लागवड करून आपल्याला तीन दशलक्ष टन कार्बन सिंक म्हणजे कार्बन शोषून घेणारी मोठी जंगले निर्माण करायची आहेत. त्यासाठी लोकांमध्ये मनोबदल करण्याची गरज आहे. आयपीसीसीने यापूर्वी हवामान बदलाचे अनेक अहवाल सादर केले आहेत. त्यांना त्याबद्दल नोबेलही मिळाले आहे. या निमित्ताने जमिनीची उपयोगिता आणि हवामान बदल याचा एक अहवाल शृंखला पद्धतीने त्यांनी मांडला आहे. हा सगळा अहवाल पाहता माणसाला येत्या काळामध्ये आपले खानपाण बदलावे लागेल. खेड्यातील सर्वसामान्य माणसाच्या ताटातली भाकरी जाऊन पोळी आली आता काळाने त्याच्या ताटात अन्नशृंखलेतले काय वाढून ठेवले आहे कोणास ठाऊक?

माणसाने हिमनगावरही अतिक्रमण केले आहे. ही आक्रमकवृत्तीच हवामान बदलास कारणीभूत आहे. यासंदर्भात आयपीसीसीने सादर केलेला अहवाल डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे. त्यापेक्षाही महत्त्वाची बाब म्हणजे जमिनीची गुणवत्ता हवामान बदलाने शंभरपटीने नष्ट होते. आपली जमीन शाबूत राहिली तरच शेती शाबूत राहील. शेती शाबूत राहिली तरच लोकांच्या हाती रोजगार राहील. त्या आधारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातला नवा भारत घडविता येईल. अर्थात, निसर्ग देवते हे सर्व तुझ्याच तर हाती आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अशाप्रकारच्या आपत्तीला तोंड देण्याची आर्थिक परिस्थिती राज्याची नाही. महापूर येताच केंद्राकडे धाव घेण्यात आली. गेल्या चार वर्षांपासून मराठवाडा दुष्काळाने गांजलेला आहे. पण हवामान बदलाला सामोरे कसे जावे, त्यानुरूप पीकरचना कशी असावी या गोष्टींचे भान नसल्यामुळे मराठवाड्यासाठी विशेष निधीची केंद्राकडे मागणी केली जात नाही. विधानसभा आचारसंहितेच्या अगोदर तरतूद होणे गरजेचे आहे.