चांद्रयान-पर्जन्ययान, फुकटाच्या पावसाला नाही मान
- संजीव उन्हाळे
२२ जुलैला
चांद्रयान-२ चंद्राकडे झेपावणार आहे. त्याच दिवसापासून ढगामध्ये आर्द्रता असेल तर
कृत्रिम पाऊस पाडण्याचे प्रयोगही होणार आहेत. केवळ पाण्यासाठी हा योग जुळून येत
आहे. तथापि, चांद्रयानासाठी
भरमसाठ पैसा, पुरेशी यंत्रणा, सुसज्ज
प्रयोगशाळा याची सोय पण पर्जन्ययानासाठी मात्र केवळ आंतरराष्ट्रीय टेंडर. कृत्रिम
पावसाची व्यवस्था आणि त्यासाठीचे पायाभूत सुविधा हवामान बदलाच्या दुख-या बदलाच्या
पाश्र्वभूमीवर करणे गरजेचे आहे. यामध्ये चीनने मोठा वस्तुपाठ घालून दिला आहे.
मराठवाड्यासारख्या कोरडवाहू भागासाठी पर्जन्ययानाची (पर्जन्ययाग यज्ञाची नव्हे)
गरज आहे.
चंद्रकांत पाटील
भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून राजकीय स्फोटांचा धडाका उडवून देत आहेत.
पाऊस पडण्याजोगे ढग निर्माण झाले तर मराठवाड्यात २२ जुलैनंतर कृत्रिम पाऊस पाडला
जाईल असा बार त्यांनी उडवून दिला. कसा योग आहे पहा, २२ जुलैलाच
तंदुरुस्त चंद्रयान-२ अंतराळात झेपावणार. (२२ जुलैला तुलनेने रोज बदलणा-या स्थितीमध्ये
चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो. त्यामुळे इंधन कमी लागते, अन्यथा
सप्टेंबरपर्यंत थांबावे लागेल) ढगाला भेदून जलबिंदू निर्माण करणारा कृत्रिम पाऊस
आणि चंद्रावर पाण्याचा शोध घेणारे चंद्रयान-२ या दोन्हींचाही उद्देश जलशक्ती
निर्माण करणे हाच आहे. म्हणजे अध्यात्मात जसे ग्यानबा-तुकाराम, चित्रपट संगीतात
शंकर-जयकिशन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, कल्याणजी-आनंदजी
त्याप्रमाणे अंतराळात आता ‘चांद्रयान-पर्जन्ययान’ ही जोडी शोभून
दिसणार आहे. ढगात क्लाऊड सिडींगचा मारा करून पाऊस पाडणा-या विमानाला
आम्ही पर्जन्ययान शब्द वापरला. पर्जन्ययाग नव्हे चंद्रकांत खैरेंसारखे भाविक
यज्ञवीर अगदी थोड्या फरकाने लोकसभेपर्यंत पोहचू न शकल्याने पर्जन्ययाग यज्ञ बहुतेक
झाला नाही. नाही तर महारूद्राभिषेक करून यज्ञ मांडला गेला असता.
अर्थात, चंद्रयान श्रेष्ठ
की पर्जन्ययान,
अशा पोरकट वाद
आम्हाला घालायचा नाही. (एका एकी ‘मी’पणा जाऊन आता ‘आम्ही’पण आले आहे. कारण
आम्हाला आता आकाशच ठेंगणे झाले आहे.) जवळपास चार-पाच दशलक्ष वर्षापासून चंद्राच्या
पृष्ठभागावर पाणी मुरले आहे. त्याचा शोध घेतला जाणार आहे. (आधीच कळले असते तर लातूर, उस्मानाबादच्या
खणण सम्राटांना आम्ही निरोप दिला असता, चंद्रावरही बोअरचे खणण करून पाणी काढले असते.
उसाचे फडही लावले असते. ही मंडळी इतकी चतुर आहे की इस्त्रोच्या मदतीने लातूर
पॅटर्न घेऊन ती केव्हाच चंद्रलोकी गेली असती) ही मोहीम यशस्वी झाली तर चार
वर्षापासून वॉटर ग्रीडचा ध्यास घेतलेले बबनराव लोणीकर यांनी थेट चंद्रावरून बंद
पाईप (हा भाजपचा खास सिंचन पॅटर्न) टाकून परतूरला पाणी आणले असते आणि तमाम
मराठवाड्याची तृष्णा भागविली असती.
तथापि, या दोन यानात
मोठा फरक आहे. मानाचे पान चांद्रयानाला अन् खर्चाचे पान पर्जन्ययानाला मानले जाते.
चांद्रयानासाठी सतत ध्यास, अभ्यास आणि संशोधन आणि पर्जन्ययानासाठी तहान लागली की खणा, कृत्रिम पावसाची
विहीर असा प्रकार चालला आहे. इंटरनॅशनल टेंडर काढून ३० कोटी रुपयाला गेल्यावेळी कंत्राट दिले तर
पोटात गोळा येतो. जलयुक्तच्या टेंडरचे वंडर घडले असते. इस्त्रोसाठी बजेटमध्ये मोठी
तरतूद केली जाते. या सरकारचा तर तो मानबिंदू. कृत्रिम पाऊस हा चमत्कार नाही ते एक
शास्त्र आहे. पाऊस पडला की आपण दुष्काळ विसरून जातो तसाच विसर कृत्रिम पावसाचाही
पडतो. पण मराठवाड्यासारख्या हवामान बदलाच्या प्रदेशाला कृत्रिम पावसावर सातत्याने
प्रयोग करण्याची गरज आहे. खरं तर हवामान बदलाचा संबंध सर्वसामान्य लोकांच्या
जीवनमरणाशी, नापिकीशी, पीकरचनेशी, अन्
पर्जन्यमानाशी आहे. औरंगाबादसकट मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांवर दुष्काळाची छाया
आहे. पण शासनाने कायमस्वरूपी रडार नागपूरला आणि तात्पुरती व्यवस्था औरंगाबादला
करून ठेवली आहे. औरंगाबाद विभागीय आयुक्तलयाच्या डोक्यावरची रडार यंत्रणा गुपचुप
हलविण्यात आली. खरं तर इस्त्रोप्रमाणे कृत्रिम पावसावर संशोधन करण्यासाठी
औरंगाबादला प्रयोगशाळा होणे गरजेचे आहे. किमान या प्रदेशात आलेल्या ढगामध्ये तरी
गोळ्या मारू द्यात.
२० जुलै १९६९
रोजी ईगल चंद्रयानातून नील ऑर्मस्ट्राँग आणि एडवीन ऑल्ड्रीन चंद्रावर उतरले, आज या
चंद्रविजयाची पन्नाशी होत आहे. त्याचवेळी आपले चांद्रयानही जात आहे. आता २०२२
मध्ये अखिल भारत वर्ष म्हणणार की शेतक-याचे उत्पन्न दुप्पट झाले. किमान प्रधानमंत्री तरी ठसकेबाज
भाषण करून शेतक-याचे उत्पन्न दुप्पट झाले असे ठासून सांगतील तेव्हा खरेच उत्पन्न दुप्पट
झाल्यासारखे वाटेल. पण या २०२२ लाच महाराष्ट्र दुष्काळाची पन्नाशी साजरी करील.
१९७२ च्या दुष्काळापेक्षा यावर्षीचा दुष्काळ अधिक भयानक होता. त्याचे गांभीर्य
नव्हते एवढेच! लोकांनी मुकाट स्थलांतर केले. पुणे-मुंबईच्या जपानी मेट्रोच्या
कामाला निघून गेले.
आमच्या उलट चीनचे
आहे. या महाकाय देशाने सातत्याने कृत्रिम पावसावर संशोधन केले. प्रदेशानुरूप, हवामानानुसार बदल
आणि सुधारणा केल्या. पण आपल्याकडे तसे काहीच घडले नाही. जगामध्ये कृत्रिम पावसावर
जेवढे प्रयोग होतात त्यापैकी निम्याहून अधिक प्रयोग चीनमध्ये होतात. (आमच्या
विद्यापीठात पदवीपुरते संशोधन होते) २००८ मध्ये चीनमधील बिजिंग शहरात ऑलिम्पिक
स्पर्धा चालू असताना मोठे प्रदूषण आढळून आले. शास्त्रज्ञांनी तात्काळ त्या ठिकाणी
कृत्रिम पाऊस टाकून ते जिरवले. ‘अगा ऐसे घडलेचि
नाही’ अशा अविर्भावात
स्पर्धा पार पाडल्या. आमच्याकडेही त्यांचे जरा अधिकचेच लक्ष आहे. आश्चर्याची गोष्ट
म्हणजे त्यांचे एक शिष्टमंडळ मराठवाड्यात आले. इथल्या हवामानाचा अदमास घेतला.
त्यानंतर त्यांनी कृत्रिम पाऊस तंत्रज्ञानाद्वारे क्लाऊड सिडींग करण्याची ऑफर थेट
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली. चीनच्या या अधिका-यांचा महाराष्ट्र
दौरा हा आपल्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे. कृत्रिम पाऊस हे मृगजळ नाही तर
तो हमखास उपाय आहे पण त्याचे शास्त्र पाळले पाहिजे असे या अधिका-यांनी सांगितले.
ख्यातनाम गीतकार
शमशूल हुडा बिहारी यांनी जाहीरपणे विज्ञान आणि तंत्रज्ञानाने आमच्या चंद्राचे
सौंदर्य घालविले आहे अशी तक्रार केली आहे. ‘ए चाँद सा रोशन
चेहरा’ असे कश्मीर की
कली चित्रपटातील गाणे खरे तर आपल्या प्रेयसीच्या सुंदर मुखड्याची आठवण करून देणारे
आहे. परंतु चंद्रावरील खड्डे पाहून कोण त्यावर विश्वास ठेवील! तरीसुद्धा कवी आणि
साहित्यिक काही केल्या चंद्राचा पिच्छा सोडणार नाहीत. अखिल विश्व साहित्य
संमेलनाचे कायम संयोजक कौतिकराव ठाले-पाटील सातत्याने पुढचे साहित्य संमेलन कोठे
घ्यावे म्हणून चिंतित असतात. चंद्रयानाचे हे मिशन जर यशस्वी झाले तर चंद्रावर
साहित्य संमेलन घेण्याचे स्वप्न ते निश्चितच साकार करतील. आणि कवीही आपली कवितेची
पासोडी चंद्रावर सोडल्याशिवाय राहणार नाहीत. अर्थात, ही सारी कवी
कल्पना नाही तर या मिशनचा एक उद्देश चंद्रावर ‘लुनार कॉलनी’ निर्माण करण्याचा
आहे. गुरू आणि मंगळ या मोठया ग्रहावर जाण्यासाठीचे चंद्र हेलिपॅड म्हणून वापरले
जाणार आहे.
खरी गोम अशी आहे
की चांद्रयानातून बराच मोठा महसूल गोळा करता येतो. इथे पाऊस फुकटात पडतो. लोक फुकटात पाणी
वापरतात. अशा फुकट्याच्या दुनियेत पाण्याच्या थेंबा थेंबाला किंमत आल्याशिवाय
कृत्रिम पावसाचे महत्त्व कळणार नाही.