जटील प्रश्नांची जंत्री, काय करतील औटघटकेचे मंत्री


- संजीव उन्हाळे

लोकसभा निवडणुकीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेने जयदत्त सोनाजीराव क्षीरसागर आणि डॉ. तानाजी जयवंत सावंत यांना वॅâबिनेट मंत्रीपद दिले तर भाजपचे अतुल मोरेश्वर सावे राज्यमंत्री झाले आहेत. उशिरा का होईना पण शिवसेनेने मराठवाड्याला न्याय दिला. त्यातल्या त्यात तानाजीराव मराठवाड्यासाठी नवखे. आता उण्यापु-या शंभर दिवसांमध्ये औटघटकेच्या या मंत्र्यांना आपली चमक दाखवावी लागेल. सभोवताली प्रचंड दुष्काळ आणि अनेक प्रश्नांना तोंड देत मंत्रिपदाला न्याय द्यावा लागणार आहे. अर्थात, ही मोठी तारेवरची कसरत ठरणार आहे.

राज्य मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेने मराठवाड्याला दोन वॅâबिनेट मंत्री दिले. भाजपच्यावतीने औरंगाबादस्थित अतुल सावे यांची राज्यमंत्रीपदी वर्णी लागली. मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला. यावेळी औरंगाबादचा बुरूज ढासळला खरा पण लोकसभेच्या इतर तीन जागा सेनेने जिंकल्या. नव्याने शिवसेनेत दाखल झालेल्या जयदत्त क्षीरसागर यांना रोहयो आणि फलोत्पादन ही महत्त्वाची खाती मिळाली. बीड जिल्ह्यामध्ये बीड शहराची जागा वगळता इतरत्र शिवसेना वाढलीच नाही विंâबहुना गोपीनाथ मुंडे यांनी शिष्टाई करून शिवसेनेचा बीडमध्ये फारसा शिरकाव होऊ दिला नाही. जयदत्त क्षीरसागर बलदंड नेते आहेत खरे पण त्यांना मंत्री केल्यामुळे दोन-तीन महिन्यातच फलोत्पादनच्या झाडाला फळे लगडणार नाहीत. अर्थात, राष्ट्रवादीला मात्र ते धक्के दिल्याशिवाय सोडणार नाहीत. राष्ट्रवादीच्या डावातील ‘बदाम’चा हुवूâमीपत्ता त्यांनी पहिल्या झटक्यातच आपल्या ताब्यात घेतला. माजी खा. केशरकावूâ यांच्यापासून चालत आलेली मोठी कार्यकत्र्यांची फळी, दांडगा जनसंपर्वâ, प्रशासकीय कौशल्य आणि राजकारणात प्रदीर्घ काळ असूनही कलंकित नसलेले जयदत्त क्षीरसागर हे आगळे व्यक्तिमत्त्व आहे. ते काँग्रेसमध्ये असते तर पहिल्या क्रमांकावर राहिले असते. राष्ट्रवादीच्या जातीयवादी साठमारीत त्यांचा जीव अनेक वर्षे घुसमटत राहिला. स्व.गोपीनाथ मुंडे आणि त्यानंतर पंकजा मुंडे यांच्याबरोबर ओबीसीचे राजकारण जिवंत ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी सातत्याने केला. त्यांच्या रूपाने मराठवाड्यात शिवसेनेला एक दमदार चेहरा मिळाला आहे हे नि:संशय.

यापूर्वी साडेचार वर्षे विदर्भातील मंत्र्यांचाच मोठा भराणा होता. अधून-मधून मराठवाड्याला न्याय मिळावा अशी मागणी व्हायची. त्यानुसार जालना जिल्ह्यातून अर्जुन खोतकर यांना राज्यमंत्रिपद मिळून गेले. वॅâबिनेट मंत्रिपद मात्र लाभले नाही. आता तर मराठवाड्यासाठी नवखे असलेले डॉ. तानाजी सावंत हे राज्याचे जलसंधारणमंत्री झाले. खरं तर जलयुक्त शिवार हा भाजपचा फ्लॅगशिप कार्यक्रम. त्या कार्यक्रमाचा झेंडा आता तानाजींच्या हाती आहे. त्यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातला. साखरसम्राटाचा होण्याचा ध्यास असल्यामुळे स्वाभाविकपणे ते प्रथमत: राष्ट्रवादीत गेले. सोलापूरला तीन आणि उस्मानाबादला परांडा तालुक्यात एक साखर कारखाना त्यांच्या मालकीचा आहे. वाशी तालुक्यातील एक साखर कारखाना त्यांनी अगदी अलीकडे भाडेतत्त्वावर घेतला. त्यांच्या प्रगतीचा आलेख इतका चढता आहे की त्याच्या अभिनिवेषातूनच त्यांनी परांडा येथे महाराष्ट्र भिकारी होईल पण मी भिकारी होणार नाही असे उद्गार काढले असावेत. गंमत म्हणजे यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेतून ते विधान परिषदेवर निवडून गेले. अगदी अलीकडे त्यांनी उस्मानाबादच्या शिवसेनेच्या नेतृत्वाचा भार आपल्या खांद्यावर घेतला आहे. साखर कारखान्याबरोबरच त्यांची अभियांत्रिकी महाविद्यालये पिंप्रीचिंचवडच्या पट्ट्यात आहेत हे वेगळे सांगायला नको. मराठवाड्यातील अनेक दिग्गज नेत्यांना कडेला सारून ते वॅâबिनेट मंत्री झाले. सर्वाधिक संपत्ती असलेल्या विधान परिषदेतील लक्ष्मीपूत्र आमदारांमध्ये त्यांचा वरचा क्रमांक लागतो. मुंबई महानगरपालिकेतील मनसेचे सर्व नगरसेवक शिवसेना प्रमुखांच्या चरणी आणण्याचे मोठे कर्तव्य त्यांनी बजावले. पंढरपूरच्या भव्य शेतकरी मेळावा यशस्वी करून दाखविला. कामाचा झपाटा एवढा की, तानाजीरावांनी भूम आणि परांडा तालुक्यामध्ये ऐंशीच्यावर बुलड़ोजर घुसविले आणि शिवजलक्रांतीचे काम अवघ्या पंधरवाड्यात करून दाखविले. वस्तुत: राहुल मोटे हे गोदावरी खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष होते. पण त्यांना जे जमले नाही ते तानाजीरावांनी काही दिवसात घडविले. शिवशाहीला शोभेल असा सरदार शिवसेनेला मिळाला पण ते स्वत:ला मराठवाडयाचा म्हणवून घेतील की नाही शंकाच आहे.

अतुल मोरेश्वर सावे हे उद्योग आणि अल्पसंख्यांक खात्याचे मंत्री झाले. भारतीय जनता पक्षाला बNयाच वर्षांपासून शिवसेनेवर वर्चस्व हवे होते. विशेषत: पाणीपुरवठा असो की डिएमआयसी याचे पूर्ण श्रेय भाजपला मिळायचे नाही. चंद्रकांत खैरे यांच्या पराभवानंतर अतुल सावे हा नवीन चेहरा मुख्यमंत्र्यांनी पुढे आणला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे उद्योगाच्या बरोबरीने त्यांना अल्पसंख्यांक खातेही दिले आहे. मोरेश्वर सावे यांचा राजकीय वारसा, सावे उद्योगाची पाश्र्वभूमी आणि मनमिळाऊ स्वभाव यामुळे सावे यांना आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप टाकण्याची संधी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मिळाली आहे.

या तीनही नव्या मंत्र्यांसमोर प्रश्नांची मोठी जंत्री आहे. जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे रोहयो आणि फलोत्पादन हे खाते. मराठवाडा हा रोहयोच्या कामात सर्वात मागे आहे. मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांचे रोहयोचे बजेट जेमतेम अडीचशे कोटी असून इतर विभाग त्यापेक्षा कितीतरी पुढे आहे. राज्य सरकार ८२५ लक्ष मनुष्य निर्मिती दिवस इतका मोठा रोजगार निर्माण केला असल्याचा ड़ांगोरा पिटत आहे पण खुलताबाद तालुक्यामध्ये राज्यात सर्वात कमी रोहयोचे काम आहे. राज्यामध्ये मराठवाड्यातील जवळपास सर्व जिल्ह्य्े तळाला आहेत. बीड, परभणी, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये हाताच्या बोटावर मोजता येतील इतकी थोडीथोडकी कामे चालू आहेत. मराठवाड्यातील मोसंबीच्या बागा गेल्या सात वर्षांपासून उद्ध्वस्त झालेल्या आहेत. सरकारने दीडदमडीची मदत केली नाही. शेतकNयांनी थेट व्हॉट्सअपवर मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांना पाझर पुâटला नाही. अशा पाश्र्वभूमीवर व बिकट परिस्थितीत जयदत्त अण्णांना हे मंत्रिपद मिळाले आहे.

जलयुक्त शिवारमध्ये तर मोठया प्रमाणावर गैरप्रकार झालेले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपर्यंत जलयुक्त शिवार राबविण्याच्या ऐवजी गैरप्रकारांचा अभ्यास करणे हे्च मोठे काम तानाजीरावांना करावे लागेल. राज्याच्या विशेष चौकशी पथकाकडून तेराशे प्रकरणांची चौकशी सुरू आहे. या गैरप्रकारामध्ये बीड जिल्हा अग्रेसर आहे. मजेची गोष्ट म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यावर जलयुक्तमधून पैशांची कथित हडपाहडपी केली असा आरोप करण्यात आला. तेव्हा आपण ही सर्व वंâत्राटे ई-टेंडरद्वारे पारदर्शक पद्धतीने मिळविली असे डिजीटल उत्तर त्यांनी दिले. निवडणुकीला उभं राहण्याची क्षमता या योजनेतून आली, असे त्यांचे अर्थशास्त्र आहे. वंâत्राटदारांची लॉबी, कृषी विभागातील अधिका-यांची अजबूकर्तबगारी यामुळे जलयुक्त शिवार दलदलयुक्त झालेले आहे. पण तरीही सरकार त्याला भ्रष्टाचार म्हणत नाही. उलट अनियमितता असा बचावात्मक शब्द वापरला जातो. या योजनेचा इतका प्रचार करण्यात आला की अगदी अलीकडे आकाशवाणीवर जेव्हा बातम्या देण्यात आल्या तेव्हा झालेला पाऊस जलयुक्तच्या ख़ड्ड्यामध्ये पडला असे निवेदकाने आवर्जून सांगितले. जणु इतर तलावात पाऊस झालाच नाही. मात्र जलयुक्तच्या वेगवेगळया उपचारपद्धतीला खड्डा हा शब्द त्यांनी वापरला तो संयुक्तिक होता. प्रत्यक्षातल्या या खड्ड्याचा आर्थिक खड्डा किती मोठा आहे याचे गौडबंगाल आता तानाजीरावांनाच शोधावे लागणार आहे.