निवडणुकीचा शिमगा अजून रंगायचा आहे...


 

- संजीव उन्हाळे

पाच वर्षांपूर्वीची मोदी लाट नाही. घोषणांचा मात्र दणदणाट आहे. विरोधी पक्ष मात्र अजूनही खेळपट्टी गवसली नाही. टांगणीला असलेले मराठवाड्याचे अनेक प्रश्न अजून ऐरणीवर आले नाहीत. शिवसेनेने विरोधी खेळपट्टी चांगली गाजवली आता युतीचा धर्म म्हणून दांडपट्टा चालवायचा आहे. सब भूमी भाजप कीअशा थाटात भाजप असून या दुष्काळी भागाला पंतप्रधानांच्या किती सभा मिळतात याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला कब्बड्डीची शिवपाटी जवळ आहे फक्त हातचालवता आला पाहिजे.

मोदी लाटेत २०१४ ला काँग्रेससकट सर्वच जण वाहून गेले. नांदेड व हिंगोलीचे काँग्रेसची बेटे तेवढी वाचली. सध्या लाट ओसरलीय पण प्रचारकी थाट आहेच. घोषणांचे बुडबुडे किती मोठे होणार, ते पहायचे. यावेळी भाजपचीे घरभेदी व्यूहरचना जोरात आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची मोठी घराणी पुâटायला लागली आहे. नातवांना आजोबांच्या वारशापेक्षा सत्तेचा सारीपाट महत्त्वाचा वाटू लागला. पुलवामा हल्ल्यातील ४० जवानांचे बलिदान व बालकोट हवाई सर्जिकल स्ट्राईकला कधी नव्हे इतके पुâगवून सांगितले जात आहे की रापेâलचा घोटाळाही त्यात विरघळून जावा. 

आर्थिकदृष्ट्या मागाससाठी १० टक्के आरक्षण, मराठा समाजास १६ टक्के आरक्षण आणि लोकपाल अशा अनेक प्रश्नांची निवडणुकीच्या तोंडावर सोडवणूक करून रंग सपेâदी केली. तरी बेरोजगारीची प्रचंड धग थांबवता येण्यासारखी नाही. सगळ्या प्रश्नांचे तारणहार नरेंद्र मोदीच आहेत असा प्रचार चालू आहे. शेतकNयांच्या प्रश्नाकडे पाच वर्षांमध्ये अक्षम्य दुर्लक्ष झाले. आत्महत्याग्रस्त शेतकNयांची अन गरीबांची प्रतारणा थांबलेली नाही. अर्थात, विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी सपशेल अपयशी ठरले. भारतात आनंदी आनंद आहे असे चित्र रंगवले जात असले तरी आपला हॅपिनेस इंडेक्स पार तळाला गेला आहे. भारत १४० व्या स्थानावर पेâकला गेला आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश हॅपिनेसमध्ये् पुढे भारताच्या पुढे आहेत. भाजपने निर्विरोध पाच वर्षे राज्य केले. महाराष्ट्रात काँग्रेसऐवजी विरोधी पक्ष म्हणून शिवसेनेने चांगले काम केले. शेतकNयांची बाजू लावून धरली, भाजपच्या नाकात शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दम आणला. अन्यथा भाडोत्री मिडियाने दुष्काळासारखे अनेक प्रश्न गिळून टाकले आहेत. अजूनही दुष्काळ राजकीय अजेंडावर नाही. पिण्याच्या पाण्याचे टँकर जाहीर करण्यापेक्षा दररोजची दारूविक्री जाहीर करावी असा आदेश निवडणूक आयोगाने काढला आहे. तेव्हापासून मराठवाड्यात २२ टक्के दारू विक्री वाढली. त्यात बीड आणि हिंगोली ग्रामीण भागात मद्यमैफिलीमुळे म्हणे सर्वाधिक खप झाला. आता निवडणुकीच्या हवेनेच एवढी चढते तर सारे उमेदवार ठरल्यावर किती चढेल याची कल्पनाच न केलेली बरी!

नेहमीप्रमाणे एकास एक उमेदवार देण्याचे अखेर मृगजळच ठरले. वंचित बहुजन आघाडीने सारे फिसकटून लावले. जातीची गणिते मांडण्यात तज्ज्ञ असलेले वंचित नेते अ‍ॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी यावेळी दलित-मुस्लिम आघाडीची तिसरी फळी उभी केली आहे. एकगठ्ठा दलित-मुस्लिम मतपेढी एकत्र येण्याची शाश्वती नाही. तसे झाले तर २१ टक्के दलित-मुस्लिम मतांचे धुव्रीकरण चमत्कार घडवू शकते. कुणी त्याला भाजपची टीम असे मजेने म्हणतात. पण रास्वसंघाबरोबरचा करार काँग्रेसने गंभीरपणे घेतला नाही, म्हणून वंचितांनी तात्विकदृष्ट्या वेगळी चूल मांडली. अर्थात, आठही लोकसभा मतदारसंघामध्ये निवडून येण्याची क्षमता असलेला एकही उमेदवार वंचित बहुजन आघाडीकडे नाही. काँग्रेसचे दिवंगत नेते एसटी प्रधान यांचा थोडक्या मतांनी पराभव झाला होता. वंचित आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर आणि ओवेसी यांच्या सभांना तरुणांचा प्रतिसाद मिळतो आहे. ही बाब केवळ काँग्रेसलाच नव्हे तर प्रसंगी भाजप-शिवसेना युतीला कोड्यात टाकणारी आहे.

२०१४ च्या निवडणुकांचा अभ्यास केला तर ३७ टक्के मुस्लिम मतदान काँग्रेसकडे गेले, दलित अनुसूचित जातीचे २४ टक्के मतदान भाजपकडे आणि केवळ १८.५ टक्के मतदान काँग्रेसला मिळाले होते. पुलवामा आणि बालाकोटमुळे काँग्रेस डळमळीत झाली आहे. भाजपने गेल्या साडेचार वर्षांत दलितांचा अनुनय करण्याची एकही संधी सोडली नाही. मग ते लंडनमधील आंबेडकरांची अभ्यासिका असलेले घर खरेदी करणे असो की मुंबईतील इंदूमिलची जागा आंबेडकर स्मारकाला देण्याचा प्रश्न! राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही दलित समाजात आपले आरोग्य आणि शिक्षण काम वाढविले आहे. शिवसेनेतही दलितांचा मोठा भरणा आहे.

यावेळी प्रत्येक पक्षाने मराठवाड्यातील उमेदवारी देताना थोडेफार पेâरबदल केले. भारतीय जनता पक्षाने सुनील गायकवाड़ यांना बदलून सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी दिली आहे. शृंगारे हे मोठे बांधकाम व्यावसायिक असून निलंगेकर-मुंडे गटातटांशी त्यांचा समन्वय आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने बीडमध्ये बजरंग सोनवणे हा नवीन चेहरा दिला आहे. तसा राष्ट्रवादी काँग्र्रेस हा नेत्यांचा पक्ष असून बीडमध्ये तर त्यांचाच बुजबुजाट आहे. त्या तुलनेत बजरंग सोनवणे हे साधे कायकर्ते म्हणून वावरतात. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांचा लोकसंपर्वâ आहे. भाजपच्या ई-टेंडरचा फायदा घेऊन ते आर्थिकदृष्ट्या म्हणे सक्षम झाले. मराठा उमेदवार आणि जोडीला धनंजय मुंडे यांची साथ यामुळे बीडची लढाई भाजपला वाटते तेवढी सोपी नाही. शिवसेनेने आपल्या दोन मतदारसंघाच्या उमेदवारात पेâरबदल केलेले आहे. उस्मानाबादचे रवि गायकवाड यांना यावेळी लोकसभेची उमेदवारी नाकारण्यात आली. त्याऐवजी ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. या खेळीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या रणनितीत बदल घडू शकेल. काँग्रेस पक्षाचा खाक्या काही वेगळाच आहे. औरंगाबाद आणि जालना या दोन्ही लोकसभा मतदारसंघात उमेदवार ठरत नाही. हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांना हिंगोलीची उमेदवारी आणि गुजरातची जबाबदारी पेलवणारी नाही. त्यासाठी आता काँग्रेसच्या उमेदवाराचा शोध चालू आहे. दरम्यान शिवसेनेने तरुणतुर्वâ उमेदवार हेमंत पाटील यांना हिंगोलीची उमेदवारी जाहीर केली आहे.

बहुधा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील लोकसभेमध्ये उमेदवार राहण्यासच काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते तयार नाहीत. बीडचे जयदत्तअण्णा क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारली. प्रत्येकाला विधानसभा यावेळी आपलीच असे वाटू लागल्यामुळे कोणी मुख्यमंत्रीपदाचे तर कोणी मंत्रिपदाचे स्वप्न पाहत आहेत. जालन्यामध्ये अब्दुल सत्तार आणि कल्याण काळे दोघेही लोकसभेचे उमेदवार होण्यास उत्सूक नाहीत. एवढे कशाला दस्तुरखुद्द काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी लोकसभेची उमेदवारी आपल्या पत्नी अमिता चव्हाण यांना दिली. पण शेवटच्या क्षणी नांदेडमधून त्यांनाच निवडणूक लढवावी लागेल असे दिसते. उस्मानाबादमधूनसुद्धा डॉ. पद्मसिंह पाटील निवडणूक लढविणार नाहीत. तथापि, राणा जगजितसिंग यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जाहीर करण्यात आलेली आहे. ही निवडणूक शिवसेनेला म्हणावी तेवढी सोपी जाणार नाही. औरंगाबाद आणि जालन्याची मात्र कोणी तिकीट घेता का तिकीटअशी अवस्था झाली आहे. होळीला रंग चढला असला तरी निवडणुकीचा शिमगा मात्र अजून रंगायचा आहे.