अस्मानी संकटातही मराठवाड्याची कुचेष्टा
ड्राय
सप्टेंबरमुळे परतीचा पाऊस आला नाही, येण्याची शक्यता नाही. नांदेड आणि हिंगोली वगळता भूजलाची पातळी
मराठवाड्यात चिंताजनकरित्या घसरत चालली आहे. नदी-नाले वाहिले नाहीत. कोणत्याही
प्रकल्पात पाणी नाही. खरीपाचा हाता-तोंडाशी आलेला घास अस्मानी संकटाने हिरावून
घेतला. प्रशासकीय पातळीवर कसलीही हालचाल नाही. कोणी मंत्री कळवळ्याने कॅबिनेटमध्ये
बोलला नाही. मराठवाडा हा महाराष्ट्राचा भाग आहे का, एवढी शंका यावी इतके अदखलपात्र आम्ही कशामुळे ठरलो?
मराठवाड्यात
सप्टेंबर अखेरीस येणारा परतीचा, उत्तरा
नक्षत्राचा पाऊस आला नाही. तसा तो येणारच नाही असे हवामान खात्याने जाहीर केले
आहे. पावसाच्या प्रदीर्घ खंडाने सप्टेंबर ’ड्राय’ ठरला. २००१ नंतर तब्बल सतरा वर्षांनी
अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्याचे चित्र
आता अधिक विदारक होणार आहे. जायकवाडी धरण जेमतेम भरले. या विभागातील नदी, नाले मात्र वाहिले नाहीत. गेल्या काही
वर्षांपासून दरवर्षी गेले वर्ष तरी यंदापेक्षा बरे होते अशी म्हणण्याची पाळी येत
आहे. कमी पावसाने पुनर्भरण थांबले, उपसा वाढला अन भूजलाची पातळी खोल खोल गेली. हिंगोली आणि नांदेड वगळता
मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत भूजलाची स्थिती चिंताजनक आहे. विशेषत: औरंगाबाद, जालना आणि बीड या भागात पाणीटंचाई उग्र
रूप धारण करीत आहे. दस-यालाच टँकर सुरू करावे लागतील अशी
परिस्थिती आहे. मराठवाड्याच्या निम्म्या प्रदेशात ४५ टक्के पेक्षा कमी पाऊस झाला
आहे. कोणत्याही जल प्रकल्पात पाणीसाठा नाही. मोठया अकरा प्रकल्पांत ३८ टक्के, ७५ मध्यम प्रकल्पात २३ टक्के आणि ७४५
लघुप्रकल्पात अवघा २२ टक्के जलसाठा आहे. सप्टेंबर अखेरीसच ऑक्टोबर हिट जाणवू लागली
आहे. कमाल तापमानात ३.५ अंशाने वाढ झाली आहे. खरीप तर गेलेच, रबीची आशा उरली नाही.
रोम जळत
असताना निरो राजा फिडल वाजवत होता, तसे मराठवाडा दुष्काळाच्या खाईत लोटला जात असताना सरकारचे सारे लक्ष
निवडणुकीवर आहे. गेल्या साडेचार वर्षांपासून मराठवाडा हा प्रदेश महाराष्ट्रातच आहे
का अशी शंका यावी इतके या सरकारने मराठवाड्याला बेदखल करून टाकले आहे. पश्चिम
महाराष्ट्राचे काँग्रेसी राजवटीत इतके कल्याण झाले आहे की पुढची २५ वर्षे तरी या
प्रदेशाकडे पाहण्याची गरज नाही. मुख्यमंत्र्यांचे लक्ष असल्याने विदर्भाची पुढील
शंभर वर्षांची बेगमी तयार आहे. मराठवाडा मात्र कायम दुर्लक्षित राहिला आहे. दस-यापासून पावसाळ्यापर्यंत स्थलांतर न करता मराठवाड्यातील जनतेस कसे
जगवावे हा प्रश्न आहे. आतापासूनच ड्राय सप्टेंबरचे चटके असह्य होत आहेत. ही स्थिती
अलनिनोमुळे की नैसर्गिक कमी दाबाचा पट्टा तयार न झाल्यामुळे झाली, हा वादाचा मुद्दा असला तरी हा विभाग
अस्मानी संकटात सापडला आहे याविषयी दुमत असू नये. सुलतानी कारभारात कमालीचा
गलथानपणा आला आहे. प्रशासन आपल्याच मस्तीत आहे. राजकारणी मंडळींना या विषयाची चाड
नाही. गेल्या दोन वर्षांपासून मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक झाली नाही. सध्याची
स्थिती इतकी असाधारण आहे की या विभागाच्या दुर्गतीवर निर्णय घेण्यासाठी तातडीची कॅबिनेट
घेणे गरजेचे आहे. दुष्काळ जाहीर करावा की पंचनामे करावेत असा खेळ सरकारने मांडला
आहे. अशाप्रकारे घोळ घालून वेळकाढूपणा करणे सद्यस्थितीत योग्य नाही.
२००१
नंतर यंदा २२.३ टक्के पावसाची घट झाली आहे. हवामाशास्त्रीयदृष्ट्या ही स्थिती इतकी
वाईट आहे की मराठवाड्यासारख्या प्रदेशात पावसाची सरासरी घट ४५ टक्के आहे.
सामान्यत: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानंतर पश्चिम नैऋत्य वा-यामुळे या भागात पाऊस येतो. तथापि, बंगालच्या उपसागरात तयार होणारा कमी दाबाचा पट्टा यावेळी तयारच झाला
नाही. उलट पश्चिम पॅसिफिक समुद्रामध्ये ‘सायक्लोनिक’
घटना घडल्या.
त्यामुळे जपान आणि फिलीपाईन्समध्ये पाऊस भरपूर झाला. पण या सगळ्या प्रक्रियेत
बंगालच्या उपसागरामधील वरूणराजाची आर्द्रता पूर्णपणे शोषून घेण्यात आली आणि या
हवामानशास्त्रीय दुर्घटनेचे भोग आपण आता भोगत आहोत. हवामानबदल विषयक इंडियन
इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे शास्त्रज्ञ जे. श्रीनिवासन यांच्या मते ड्राय सप्टेंबरला
कोणतेही बाह्य कारण जबाबदार नाही. पॅसिफिक समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याने
क्षीण स्वरूपाचा अलनिनो तयार झाला आणि त्यामुळे हे संकट ओढवले असे मुळीच वाटत
नाही. तथापि, एमजीएम औरंगाबादच्या अब्दुल कलाम
अंतराळ व खगोल संस्थेचे शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांच्या मते मात्र हा
अलनिनोचाच परिणाम आहे. ओरिसातील भवानीपट्टणम व आंध्रप्रदेशातील गोपाळपूर येथून
भारतात दाखल झालेले दायेचक्रीवादळ उत्तर पश्चिम दिशेला सरकले. २१ सप्टेंबर रोजी
त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले.
यावर्षी
इतर जिल्ह्यांच्या तुलनेत औरंगाबाद जिल्ह्याची स्थिती चिंताजनक आहे. ६५ महसूल
मंडळांपैकी निम्म्या महसूल मंडळात पाऊस अत्यल्प आहे. जिथे पर्जन्याचे प्रमाण नेहमी
जास्त असते त्या खुलताबाद तालुक्यात सरासरी ४७ टक्के पाऊस असून वैजापूर, औरंगाबाद, पुâलंब्री, पैठण या सर्वच तालुक्यांच्या पावसाची
स्थिती गंभीर आहे. मक्याला फुलोरा आणि कणसे लागण्याच्या अवस्थेतच पावसाने दडी
मारल्यामुळे उत्पन्नात किमान २५ टक्के घट येण्याची शक्यता आहे. कापसाचे क्षेत्र
मराठवाड्यात १७.७६ लाख हेक्टर असून झाडाला पाती, फुले आणि काही ठिकाणी बोंडे लागण्याच्या अवस्थेतच पावसाने दडी मारली
आहे. बीड जिल्ह्यात जिरायत क्षेत्रामध्ये कापूस पिकाची वाढ खुंटली आहे. जालना, अहमदपूर, जळकोट आदी ठिकाणी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर झालेला आहे.
सोयाबीन पिकालाही शेंगा लावण्याच्या अवस्थेतच पावसाने दडी मारली आहे. एवंâदरच खरीप पिकावर या गोष्टींचा मोठा
परिणाम होणार आहे. यापेक्षाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची
शक्यता आहे. येलदरी (९ टक्के), मांजरा
(२ टक्के), माजलगाव (० टक्के), सिनाकोळेगाव (० टक्के) या मोठया
प्रकल्पांची अवस्था वाईट आहे. याशिवाय वाढत्या उन्हाने बाष्पीभवनही मोठया
प्रमाणावर होत आहे. ही सगळी स्थिती गंभीर होत असताना शासनस्तरावर सर्वकाही आलबेल
आहे. अजून साधी आढावा बैठक झाली नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीचे सोडा, पालकमंत्र्यांनीसुद्धा या प्रश्नाचे
गांभीर्य लक्षात घेतलेले नाही. मराठवाड्याची ही कुचेष्टा केव्हा थांबणार?