पावसाची कथा, शेतीची दुरवस्था तरी सरकारची अनास्था
-- संजीव उन्हाळे
ऑगस्ट उजाडला तरी पावसाचा खंड थांबलेला नाही.
शेतकरी त्रस्त आहे. दरम्यान मराठा आंदोलन पेटल्याने मराठवाड्याच्या या टंचाई
स्थितीकडे कोणाचे फारसे लक्ष नाही. कृत्रिम पाऊस पाडणारी रडारसकट सगळी यंत्रणा हलविण्यात
आली. वर्षामेघ भेदणारा गोळा असलेल्या फ्लेअर्सचे रबरी कवच म्हणे उंदरांनी फस्त
केले. अस्मानी संकटाबरोबर सुलतानी कारभार पार ढेपाळलेला आहे. शेतीची शोकांतिका
थांबत नाही. सरकार काही ऐकत नाही. गा-हाणे कोणाकडे मांडायचे?
लोणीत (ता.वैजापूर) गावक-यांनी मारूतीरायाला साकडे घातले. धोंडी
धोंडी पाणी दे करीत दिंडी काढली. वरुणदेव काही पावला नाही. सडा शिंपडल्यासारखे
पडून ढग निघून जातात. पाऊस पाडण्यासाठी सरकारने भलेथोरले रडार यंत्र आणले होते.
विभागीय आयुक्तालयाच्या गच्चीवर बसविलेले हे यंत्र सात-आठ महिन्यांपूर्वीच अन्यत्र
हलविण्यात आले. सोलापूरला कृत्रिम पाऊस पाडण्यासाठीचे विमान मात्र चिकलठाणा
विमानतळावर तैनात आहे. तिकडे भाजपची चलती आहे. औरंगाबादला सावत्र राजकारण्यांचे
रडगाणे थांबत नाही. गंमत म्हणजे पाऊस पाडण्यासाठी आणलेल्या विमानावर बसविलेले
वर्षामेघ फ्लेअर्सचे रबर उंदरांनी कुरतडून फस्त केले. ही वदंता मोठी रंजक आहे.
२०१५ मध्ये कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग करण्याचा निर्णय घेण्यात आला. ४ ऑगस्ट
ते ३१ ऑक्टोबर २०१५ या कालावधीमध्ये ११२ तास कृत्रिम पावसाची पेरणी (सिडींग)
करण्यात आली. त्यासाठी वर्षामेघ भेदणारे ५०० फ्लेअर्स वापरण्यात येतात. या
फ्लेअर्समध्ये प्रामुख्याने सिल्वर आयोडाईड हे रसायन असते. त्यावर रबराचे वेष्टण
असते. वर्षामेघावर या फ्लेअर्सचा मारा केला जातो. या मा-यामुळे स्फोट होत नाही तर पाऊस पडण्यास
मदत होते. पण थेंबभरही पाऊस झाला नाही. ख्याती क्लायमेट मॉडीफीकेशन लि. या
बंगलोरस्थित कंपनीने विमानतळाच्या जुन्या इमारतीमध्ये असे अडीच हजार फ्लेअर्स
वळचणीला साठवले होते. दरम्यान विमानतळाची जुनी इमारत पाडण्यात आली आणि त्या ठिकाणी
अद्ययावत कार्गो इमारत उभी राहिली. फ्लेअर्स कुठे गायब झाले ते कुणाला कळलेही
नाही. भंगारात विकले म्हणावे तर त्याची कुठेही नोंद नाही. तत्कालीन महसूल मंत्री
एकनाथ खडसे यांना या कृत्रिम पावसाने इतकी मोहिनी घातली की ते स्वत: आकाशात जाऊन
फ्लेअर्सचे शिंपण ते करून आले होते. मंत्रिपद गेल्यानंतर त्यांनी मंत्रालयातील
मोठा मूषक घोटाळा उघडकीस आणला होता. त्यावेळी खडसेंना जर हे हवाई फ्लेअर्स
उंदरांच्या तोंडी देण्यात आले, असे
कळले असते तर तेही हळहळले असते. उंदीरपुराण सोडा कृत्रिम पाऊस पाडण्याची मोठी
ख्याती असलेल्या ख्याती कंपनीची रडार यंत्रही विभागीय आयुक्तालयाच्या गच्चीवरून
हलविण्यात आले. म्हणजे आता कृत्रिम पाऊस पाडण्याचे प्रयोग म्यान करण्यात आला आहे.
ईडा, पिडा टळो अन् सोलापूरला पाऊस पडो. पण
हा सगळा कृत्रिम पाऊस बकवास आहे.
मराठवाड्यातील ४६१ महसुली मंडळांपैकी निम्म्या
महसुली मंडळात अत्यल्प पाऊस आहे. बीड जिल्ह्यामध्ये वार्षिक सरासरीच्या एकुण ३०.४
टक्के इतकाच पाऊस नोंदविला आहे. जालन्यामध्ये जून आणि जुलैमध्ये २२० मिमी इतकेच
पर्जन्यमान झाले. त्यात सर्वाधिक वाईट स्थिती जाफ्राबाद, अंबड, घनसावंगी आणि भोकरदन तालुक्यात निर्माण झाली आहे. मराठवाड्यातील
जवळपास सर्वच धरणे कोरडीठाक आहेत. अजून पावसाचा भरवसा नाही.
घोषणा मोठी, मदत छोटी, अशी स्थिती आहे. राज्यात तेरा कोटी
वृक्ष लागवडीच्या घोषणेची परिपूर्ती झाली म्हणे. जुलै महिन्यात मराठवाड्यात पाऊसच
नव्हता तेव्हा तीन कोटी झाडांचे खरेच रोपण झाले की डिजीटल पद्धतीने लावण्यात आले!
तथापि कोटी कोटीची उड्डाणे भरणाNया
या सरकारला असे प्रश्न विचारणे योग्य नाही. खरी स्थिती अशी आहे की विस्तार
कार्यक्रम हा कृषी विभागाचा गाभा होता. पण जलयुक्तचे फॅड कृषी कर्मचा-यांच्या मागे लावून देण्यात आले. प्रत्यक्षात कृषी विस्तार सोडून
आपल्या डेव्हलपमेंट फॅशनसाठी हे सर्व कर्मचारी जुंपलेले आहेत. या राज्याला पूर्णवेळ
कृषीमंत्री नाही. कृषी खात्यातील अनेक जागा रिकाम्या. ‘गाय गेली जिवानिशी, शिंगरू मेलं हेलपाट्यानं’ अशी कृषी खात्याची स्थिती आहे.
मराठवाड्यामध्ये तर हे चित्र अधिक दारुण आहे. कोटी कोटीच्या घोषणात मशगुल असलेल्या
या मायबाप सरकारला कोटी कोटी प्रणाम केल्याशिवाय दुसरा उपाय नाही.